मुंबई | Mumbai
मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एएनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि पक्षांकडून त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर टीका केली असून, काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
हे २००८ चे षड्यंत्र सर्वांसमोर आले आहे. त्या काळातील सरकारने मतांच्या राजकारणासाठी “हिंदू टेरर” आणि “भगवा दहशतवाद” या शब्दांचा वापर केला. तुम्हाला माहित असेल की, संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत होते, तेव्हा इस्लामिक दहशतवाद चर्चेत होता. यामुळे आम्हाला जे मत देणारे लोक आहेत, त्यांचा रोष ओढवू नये म्हणून हिंदू दहशतवाद ही थेअरी निर्माण करण्यात आली. लोकांना अटक करण्यात आली आणि हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना टार्गेट करण्याचे षड्यंत्र होते. पण अनेक प्रयत्न करूनही त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळू शकले नाहीत. काही स्वयंसेवक असे होते की, ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता.
“आम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ नये किंवा त्यांना वाटावे आम्ही बॅलन्स करतोय, यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवण्यात आली. लोकांना अटक केली. असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
मालेगाव प्रकरणाच्या निकालावर कालही प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले होते की, “काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी हिंदू दहशतवाद आहे, भगवा दहशतवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता, तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झाले आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे.”
“ठोस पुरावे त्यांना मिळाले नाही. अनेक अधिकारी असे होते, ज्यांच्यावर भरपूर दबाव टाकण्यात आला. त्यांनी सुद्धा सांगितले आम्ही असे बेकायद काम करणार नाही. हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत आहे. त्यावेळी इस्लामिक दहशतवाद होता, आजही आहे. पण असे कोणी म्हटले नव्हते की, सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेक गंभीर गोष्टी बाहेर येतील असे ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




