Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, सत्तेसाठी...

मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, सत्तेसाठी…

मुंबई | Mumbai

काल (दि.२३ जून) रोजी केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात (BJP) बिहारची (Bihar) राजधानी पाटणा येथे १५ विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उपस्थित होते. या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे…

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा (Patna) येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही. झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत.” असे ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

मुंबईत मान्सूनची हजेरी; पुढील २४ तासांत राज्यातील ‘या’ भागांत जोरदार कोसळण्याचा अंदाज

पुढे शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्यांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे (उद्धव ठाकरे) सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

“देवेंद्रजी, कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा…”; उद्धव ठाकरे यांचा गर्भित इशारा

शिंदेंनी पुढे ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. बैठकीत आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

तसेच कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची (Corruption) आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का?, असा प्रश्न देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी उपस्थित केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Ashadhi Ekadashi 2023 : वारकऱ्यांसाठी आंनदाची बातमी! शासकीय महापूजेत विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन होणार

- Advertisment -

ताज्या बातम्या