Friday, June 13, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे घातली भावनिक साद, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे घातली भावनिक साद, म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथ दिवस आहे. याच दरम्यान, आज एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातल्या शेतकऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावनिक साद घालताना आपल्या पत्रात लिहीलं की,

माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो, सर्वाना सप्रेम जय महाराष्ट्र! महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करता आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं. तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात… हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं….वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय…. लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे… तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….’ शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका… आत्महत्या करू नका… मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं…. मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना… चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया! जय महाराष्ट्र ! आपलाच, (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बेशिस्त

Nashik News: बेशिस्त पार्किंग, अनधिकृत गाड्या, विक्रेत्यांमुळे शहराचा चेहरा बकाल; आ....

0
नाशिक | प्रतिनिधी शहरातील द्वारका, मुंबई नाका तसेच इतर प्रमुख चौक व रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नाशिक शहराचा चेहरा बकाल होत आहे. बेशिस्त पार्किंग, अनधिकृत...