मुंबई | Mumbai
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विधानभवन परिसरात अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, तेव्हा एका गोष्टीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतापल्याचे पहायला मिळाले.
खरेतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित व्यक्तींना विधान भवन परिसरात आणल्याबद्दल खेद व्यक्त करावा, असे सांगितले. यानंतर पडळकर यांनी खेद व्यक्त केला. नंतर जितेंद्र आव्हाड बोलण्यासाठी उभे राहीले तेव्हा म्हणाले, “सभागृहात मी एकटाच येतो. माझ्यासोबत मी कधीही कुणाला आणत नाही. कुणाच्या पासवर सही करत नाही. रेकॉर्डवर चुकीचे येऊ नये. ही घटना घडल्यावर मी सभागृहात किंवा परिसरात नव्हतो. या घटनेशी थेट माझ्याशी संबंध नाही. मी कुणाला खुणवले सुद्धा नाही. पण, मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देण्यात आली.” यावरुन विधानसभा अध्यक्षांनी तु्म्हाला या विषयी राजकारण करायचे आहे का असे म्हटले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्यास सुरुवात केली.
“धमकीचा उल्लेख करण्याला मनाई नाही. पण अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही. तो विषय वेगळा मांडता येईल. ही प्रतिष्ठा कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बससेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या शिव्या पडत आहेत त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. सगळे आमदार माजले असे आपल्या नावाने बोलले जाते. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करुन आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




