Friday, May 3, 2024
Homeनगरसीएनजी पंप घेण्यासाठी घातले 15 लाख

सीएनजी पंप घेण्यासाठी घातले 15 लाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सीएनजी पंप सुरू करून देण्याच्या नावाखाली कर्जत येथील व्यावसायिकाची 15 लाख 45 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सदरचा प्रकार 11 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान घडला असून याप्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

अशिष गोविंद निलंगे (वय 43, रा. बाजारतळ, निलंगे गल्ली, कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. राजेश शुक्ला व सिध्दार्थ शुक्ला (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगे हे 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी असताना त्यांनी सीएनजी पंपाबाबत गुगलवर माहिती सर्च केली. त्यामध्ये त्यांना अदाणी कंपनीची माहिती दिसली असता त्यामध्ये त्यांनी नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी नमूद केला. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी त्यांना राजेश शुक्ला नामक व्यक्तीचा फोन आला व मी अदाणी गॅस कंपनीतून बोलतो, असे सांगितले. निलंगे यांच्यासोबत सीएनजी पंप घेण्यासंदर्भात चर्चा केली. शुक्ला याने निलंगे यांना एक अ‍ॅप्लीकेशन अर्ज दिला तो निलंगे यांनी भरून पाठविला.

दरम्यान, त्यानंतर शुक्ला याने निलंगे यांच्यासोबत संपर्क करून पंप देण्याचे सांगितले. त्याने निलंगे यांच्याकडून जागा राखीव करण्यासाठी 45 हजार 500, डिलरशिपसाठी दोन लाख 75 हजार, शासकीय परवानग्या, पर्यावरण खात्याची मंजुरी करीता पाच लाख 25 हजार रुपये व केंद्र सरकारच्या डिपॉझीटससाठी सात लाख रुपये असे एकूण 15 लाख 45 हजार 500 रुपये वेळोवेळी बँक खात्यात घेतले. त्यानंतरही निलंगे यांना कंपनी सिक्युरिटीसाठी नऊ लाखांची मागणी केली असता त्यांना संशय आला. त्यांनी त्यांच्या मित्राकडे चौकशी केली असता सदरचा प्रकार खोटा असल्याचे दिसून आले.

आपली फसवणूक झाल्याचे निलंगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची पोलिसांनी चौकशी करून 11 ऑक्टोबर रोजी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या