अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे 2024 मध्ये जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यातही सहकार विभागाच्या वेळोवेळी निघालेल्या आदेशामुळे सहकार संस्थांची रणधुमाळी लांबली होती. मात्र, 2025 मध्ये नगर जिल्ह्यात 425 सहकारी संस्थांच्या निवडणुका रंगणार असून यात मोठी आणि महत्वाची संस्था असणार्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी 4 फेबु्रवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने माध्यमिकचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
2024 मध्ये देशात लोकसभा तर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. यात सुरूवातीला उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात खासदारकीची निवडणूक झाली. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. पावसाळा संपतो ना संपतो लगेच दिवाळी आली आणि त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. ही निवडणूक संपल्यानंतर मागील महिन्यांत राज्याच्या सहकार विभागाने आदेश काढत निवडणूक न झालेल्या संस्थांच्या निवडणुका 2025 मध्ये पूर्ण करण्याचे आदेश काढले आहेत.
नगर जिल्ह्यात चालूवर्षी निवडणूक होण्यास पात्र असणार्या सहकारी संस्थांची संख्या 425 आहे. यात ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील संस्थांचा समावेश आहे. या सहकारी संस्था फारशा मोठ्या नसल्यातरी त्यांच्या निवडणूक कार्यक्रम पारपडण्याचे काम सहकार विभागाला पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी जिल्हा पातळीवर सहकार विभागाने तयारी सुरू केली असून पुढील 15 दिवसात यातील पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची प्रमुख संस्था असणार्या माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. सहकार विभागाने 10 जानेवारीला या संस्थेच्या निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. त्यावर सोमवार (दि.20) तारखेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत होती. ही मुदत संपली असून प्रारूप मतदार यादीवर केवळ एकच हरकत घेण्यात आली आहे. ही हरकत सोसायटीच्या वतीने घेण्यात आली असून यात एक सभासद मयत आणि एकजण थकबाकीदार आहे. मात्र, असे असतांना त्यांची नावे मतदार यादी आली आहेत. ही कमी करण्याची मागणी हरकतीव्दारे घेण्यात आली आहे.
माध्यमिक सोसायटीसाठी आलेल्या हरकतीवर सहकार विभाग सुनावणी पूर्ण करत 4 फेबु्रवारीला निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणार आहे. याचदरम्यान, निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्त करण्यात येवून राज्य सहकार विकास प्राधिकरण यांच्याकडे सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून तो मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. ही मान्यता मिळाल्यानंतरच माध्यमिक शिक्षक सोसायटीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
9 हजार 154 सभासद पात्र
माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी प्रारूप यादीत 9 हजार 154 सभासद मतदार आहेत. आधी ही संख्या 9 हजार 430 होती. यातील 150 सभासद हे मयत झालेले असून 42 जण सेवानिवृत्त तर 84 सभासद थकबाकी आहेत. या सर्वांना वगळून 9 हजार 154 सभासद हे प्रारूप मतदार यादीत आहेत. यात देखील अंतिम मतदारयादी जाहीर करतांना बदल होणार आहेत.
फेब्रुवारीअखेर अथवा मार्चमध्ये निवडणूक
माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे निवडणूक कार्यक्रम पाठवण्यात येणार असून त्याच्या मान्यतेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान, आतापासून माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी माध्यमिक शिक्षकांमधील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
सहकारच्या या संस्था निवडणुकीसाठी पात्र
जिल्ह्यात 2025 मध्ये ‘ब’ वर्गात 29, ‘क’ वर्गात 140 आणि ‘ड’वर्गात 256 अशा 425 सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. पुढील 15 दिवसात यातील पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधीत संस्थांची मतदार यादी मागवण्यात येणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.