पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील मोहज देवढे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये 14 लाख 10 हजार 369 रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. संस्थेचे तत्कालीन सचिव सुरेश दत्तात्रय देशमुख यांनी ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे लेखापरीक्षणातून निष्पन्न झाले आहे. हा अपहार 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 या कालावधीत करण्यात आला आहे. सचिव देशमुख यांनी सचिव पदाची जबाबदारी पार न पाडता, संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ तसेच जिल्हा बँकेच्या शाखेला कोणतीही माहिती न देता व्यवहारातील मोठी रक्कम योजनाबद्धरित्या वळवली.
याप्रकरणी लेखापरीक्षक शशिकांत सुखदेव थोरात यांनी मंगळवारी (दि. 8 एप्रिल) पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, देशमुख यांच्याविरोधात फसवणूक व विश्वासघाताच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, या प्रकारामुळे संस्थेतील सभासदांमधून संताप व्यक्त केला जात असून सहकारी संस्थांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.