Friday, June 19, 2026
Homeदेश विदेशAbhijeet Dipke : जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांना...

Abhijeet Dipke : जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण

जयपूर । Jaipur

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली डिजिटल राजकीय चळवळ, अर्थात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर जयपूरमधील एका आंदोलनादरम्यान जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंदोलन शांततेत सुरू असताना एका अज्ञात तरुणाने सुरक्षा कडे भेदून दीपके यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित घटनेमुळे आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली असून परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बेरोजगारी आणि सरकारी परीक्षांमधील कथित गोंधळाच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’तर्फे जयपूरमध्ये एका भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन रंगात आलेले असतानाच, गर्दीतून एक अज्ञात तरुण अचानक पुढे आला आणि त्याने थेट अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला चढवला. त्या तरुणाने दीपके यांना एकामागून एक कानशिलात लगावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार पाहताच दीपके यांच्या समर्थकांचा संयम सुटला. त्यांनी तातडीने त्या हल्लेखोर तरुणाला पकडून चोप दिला. या अचानक झालेल्या वादामुळे घटनास्थळी मोठी धावपळ उडाली आणि काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

अभिजीत दीपके यांना यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. याच कारणास्तव सुरक्षेची खबरदारी म्हणून त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र, जाहीर आंदोलनादरम्यान असा हल्ला झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’ ही पारंपरिक राजकीय पक्षांपेक्षा वेगळी, सोशल मीडियावर अत्यंत वेगाने व्हायरल झालेली एक डिजिटल राजकीय चळवळ आहे. देशातील बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तरुणांनी या अनोख्या पक्षाच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. अल्पावधीतच या चळवळीने सोशल मीडियावर मोठा जम बसवला असून, या हल्ल्यानंतर तरुणांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

उद्धव

Uddhav Thackeray: “किरणांचा उघडून पिसारा, देवदूत कोणी, काळोखावर…; खासदार फुटीनंतर उद्धव...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनेतील खासदारांच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. थोडक्यात पण प्रभावी शब्दांत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना...