Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधथंडीतले खाणे

थंडीतले खाणे

‘ठंडी हवाएँ लहराके आएँ’ हे गाणे ऐकताना वातावरणातील शिशिराची शिरशिरी अधिकच जाणवली. हिवाळ्यात (हेमंत व शिशिर) केवळ थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा वाढायला लागतो. त्वचा कोरडी, रूक्ष होते, हातापायाला भेगा पडतात. इतकेच नाही तर आतड्यांनादेखील कोरडेपणा येतो. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा.

डॉ. शीतल भूषण सुरजुसे

बदाम, काजू, मनुका, अक्रोड आदी सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्यांचा आहारात समावेश करावा. तुपाचे सेवन करावे. याच हेतूने घराघरांतून डिंक, मेथी, अळीव आणि सुका मेवा घालून लाडू तयार केले जातात.

- Advertisement -

शिशिरात थंडीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उष्ण पदार्थ उपयुक्त ठरतात. उष्ण गुणधर्म असणार्‍या बाजरीचा आहारात समावेश करावा. बाजरीने रूक्षता वाढू नये म्हणून त्यासोबत लोणी, तूप किंवा तीळ वापरावे. याच काळात मकरसंक्रांत येते. तीळ आणि गूळ घालून तयार केलेले तीळगुळाचे लाडू, गूळपोळी या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

आपले सण, रुढी, परंपरा हेदेखील आरोग्याचाच विचार करून योजले गेले आहेत, याची साक्ष देतात.

याकाळात जाठराग्नी (पचनशक्ती) उत्तम असते. मटन, मांस, मासे, अंडी यांसारख्या मांसाहाराचाही आहारात समावेश करावा.

लसूण, मिरी, मोहरी, लवंग, जिरे, आलं, हिंग, तमालपत्र आदी मसाल्यांचा जेवणात वापर करावा. हे करत असताना कोणताही अतिरेक होणार नाही ही दक्षता घेणे महत्त्वाचे. संत्री, द्राक्षे या फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. यामुळे त्वचेचे पोषण होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ही फळे चयापचय क्रियाही वाढवतात. हिवाळ्यात आवळा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. रोगप्रतिकारक शक्तीवाढीसाठी ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आवळा हा प्रमुख घटकद्रव्य असणारा 52 औषधींयुक्त च्यवनप्राशचे नियमित सेवन करावे. घसा खवखवणे, सर्दी-खोकला कमी करण्यास हळद, सुंठ दुधातून घ्यावे.

आल्याचा रस व मध यांचे चाटण घ्यावे. चहा घेत असाल तर त्यात आले, तुळस, गवती चहाचा वापर करावा. हिवाळ्यात मिळणारे लाल गाजर, नवलकोल, हिरव्या पालेभाज्या या भाज्या पौष्टिक तर असतातच त्यासोबत सर्दी, खोकला, फ्लूसारख्या आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते. थंडीत पाणी कमी प्रमाणात सेवन केले जाते. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते म्हणून भाज्यांचे गरम सूप, ताज्या फळांचा ज्यूस घ्यावा. थंडीत फ्रीजमध्ये ठेवलेले थंड दूध, दही, थंड पेय यांचे सेवन करू नका. सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

आहाराला यथाशक्ती व्यायामाची जोड द्यावी – हिवाळा हा आरोग्यदायक, शरीर आणि मन प्रसन्न करणारा ऋतू आहे. या काळात केलेले आहार-विहाराचे योग्य नियमन दीर्घकालीन निरोगी आयुष्यासाठी गुंतवणूकच म्हणता येईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या