मुंबई | Mumbai
मध्य प्रदेशात विषारी कफ सिरप प्यायल्याने किडनी निकामी होऊन झालेल्या २० मुलांच्या मृत्यूंच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या विशेष तपास पथकाने विषारी कफ सिरप “कोल्ड्रिफ” बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचा मालक रंगनाथन गोविंदन याला अटक केली आहे.
बुधवारी रात्री तामिळनाडूतील चेन्नईत छापा टाकत रंगनाथन गोविंदन याला मध्य प्रदेश विशेष तपास पथकाने अटक केली आहे. एसआयटीने कंपनीकडून महत्त्वाची कागदपत्रे, औषधांचे नमुने आणि उत्पादन रेकॉर्ड देखील जप्त केले आहेत. रंगनाथन पत्नीसह फरार झाला होता. चेन्नईमध्ये, चेन्नई-बेंगळुरू महामार्गावरील रंगनाथनचे 2000 चौरस फूट क्षेत्रफळाचे अपार्टमेंट सील करण्यात आले, तर कोडंबक्कममधील नोंदणीकृत कार्यालय बंद आढळले.
विषारी कफ सिरप प्यायल्याने मध्य प्रदेशमध्ये २४ बाळांच्या मृत्यूनंतर ५ ऑक्टोबर रोजी छिंदवाडा येथील पारसिया पोलिस ठाण्यात औषधी कंपनी श्रीसन फार्माचे संचालक बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रविण सोनी आणि अन्य जबाबदार व्यक्तींविरुध्द बीएनएस कलम १०५, २७६ आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटीक्स कायद्या १९४० च्या कलम २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरपमध्ये विषारी पदार्थ आढळल्याचा आरोप
मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये प्रशासनाने कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री आणि वितरण तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मुलांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या या सिरपमध्ये विषारी पदार्थ आढळल्याचा आरोप आहे. चेन्नई येथील औषध परिक्षण प्रयोगळाशेतील सरकारी विश्लेषकांनी केलेल्या चाचणीचून असे आढळून आले आहे की, या कफ सिरपमध्ये ४८.६ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात विषारी औद्योगिक रसायन डायथिलीन ग्लायकॉल आढळले आहे. यानंतर सिरपचा दर्जा हा स्टँडर्ड गुणवत्तेचा नाही असे जाहीर करण्यात आले आहे.
चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
दरम्यान, कोल्ड्रिफ सिरपच्या चौकशीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. तामिळनाडूच्या ड्रग्ज कंट्रोल डायरेक्टरच्या अहवालात हे सिरप नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवल्याचे उघड झाले आहे. तपासणीदरम्यान, कंपनीच्या मालकाने तोंडी कबूल केले की त्याने दोन हप्त्यांमध्ये प्रोपीलीन ग्लायकॉलच्या ५० किलोच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या. याचा अर्थ कंपनीने १०० किलो विषारी केमिकल खरेदी केले होते. तपासादरम्यान कोणतेही बिल आढळले नाही आणि खरेदीच्या नोंदीही करण्यात आल्या नाहीत. चौकशीदरम्यान, तपास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की पेमेंट कधी रोखीने तर कधी जी-पे द्वारे करण्यात आले.
तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटला असे आढळून आले की या निकृष्ट रसायनाचा वापर करून अनेक औषधे तयार केली जात होती. परिणामी, तपासणी पथकाने तपासणी दरम्यान आपली चौकशी सुरू ठेवली. त्यावेळी कंपनीकडे प्रोपीलीन ग्लायकॉलचा साठा नसल्याचे त्यांना आढळले. यामुळे कंपनीने रसायनाची जलद विल्हेवाट लावून कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आणखी बळावला. तामिळनाडू ड्रग कंट्रोल अथॉरिटीने म्हटले आहे की, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक आहे, कारण नॉन-फार्मास्युटिकल-ग्रेड रसायनांचा वापर करून बनवलेली औषधे मुलांसाठी आणि प्रौढांसाठी घातक ठरू शकतात.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




