अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar
शेतकर्यांना पिकांच्या मशागतीसाठी पीककर्जाची निकड भासते. चालू हंगामामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्याला पीककर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व बँकांनी समन्वयाने काम करावे. बँकांना पीककर्ज वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होईल, यादृष्टीने काम करावे. पिक कर्जासाठी तालुका पातळीवर कृषी विभागासह अन्य शासकीय यंत्रणा व बँकांनी कॅम्पचे आयोजन करून शेतकर्यांना पिक कर्ज उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरबीआयचे प्रतिनिधी राजेंद्र कनिशेट्टी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बालाजी बिराजदार, ग्रामोद्योग अधिकारी बालाजी मुंडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, पर्यटन संचालनालयाच्या प्रकल्प अधिकारी गायत्री साळुंके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, शेतकर्यांना पीककर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. दिलेले उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करुन प्रत्येक गरजू व पात्र शेतकर्याला पीककर्ज मिळावे यासाठी कृषी विभाग, ग्रामसेवक तसेच तालुकास्तरीय अधिकार्यांच्या सहकार्यातून बँकांनी ग्रामीण पातळीवर कँम्पचे आयोजन करावे. पीककर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची पूर्तता या कँम्पच्या माध्यमातून करुन घेण्यात यावी. क्षुल्लक कारणांवरून कर्जाचे प्रस्ताव नाकारण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांच्या कर्जांची प्रकरणे बँकांकडे संबंधित विभागामार्फत पाठविण्यात येतात. अशी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बँकांमध्ये प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावेत. ग्राहकांनी बँकांकडे केलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेत करुन त्याची माहिती सादर करण्यात यावी. ई- पींक रिक्षासाठी मंजूर लाभार्थ्यांना तातडीने निधीचे वितरण करावे. जिल्ह्यातील उद्योजकांना आवश्यक असणार्या तांत्रिक मनुष्यबळाच्या मागणीनुसार आरसेटीमार्फत प्रशिक्षण घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.
यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सीएमईजीपी, पीएमईजीपी, एमएसआरएलएम, पी. एम विश्वकर्मा यासह ईतर विभागामार्फत कर्ज पुरवठ्यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा पत आराखडा 2025 चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाची अंमलबजावणी करा
महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने-सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास ही महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसुत्री आहे. या पंचसुत्रीवर अधिक लक्ष केंद्रीत करत जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्र असलेल्या ठिकाणी विशेष कँपचे आयोजन करण्यात येऊन महिलांना योजनेची माहिती द्यावी. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही या ठिकाणी करण्यात येऊन ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.