Tuesday, July 16, 2024
Homeनगरपालकमंत्र्यांच्या प्रतिक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी ताटकळले

पालकमंत्र्यांच्या प्रतिक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी ताटकळले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कृषी दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील 140 शेतकर्‍यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संबंधीत शेतकर्‍यांचा सन्मान करणार होते. मात्र, चार- साडेचार तासांच्या प्रतिक्षेतनंतर पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आलेच नाही. यामुळे अखेर कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना उपस्थितीत शेतकर्‍यांचा सन्मान करून त्यांना जेवण करून त्यांना पाठवण्याची वेळ आली.

शनिवारी 1 जुलैचे औचित्य साधून कृषी विभागाचा राज्यशासनाचा विविध पुरस्कार प्राप्त 70 शेतकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यात यशस्वी अंमलबजावणी केलेल्या 16 शेतकर्‍यांचा, आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ठ 14 शेतकर्‍यांचा आणि राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील पिक स्पर्धेत विज्येत्या 30 अशा 140 शेतकर्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार होता. यासाठी संबंधीत शेतकर्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10. 30 ला बोलवण्यात आले होते. मात्र, दुपारी दोनपर्यंत पालकमंत्री आणि अन्य अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले नाहीत. ते सहकार सभागृहात दुसर्‍या कार्यक्रमात व्यस्त असल्याने अखेर कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी उपस्थित शेतकर्‍यांचा सन्मान करून त्यांना जेवू घालून पाठवून दिले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शेतकर्‍यांनी शेतीमध्ये नवीनवीन प्रयोग करून खर्‍याअर्थाने कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम केले. कृषिदिनी त्यांचा गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रात भरीव योगदान असून, त्यांचा जन्मदिन कृषिदिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो, असे प्रतिपदन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक विलास नलगे, उपसंचालक राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड, कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, कृषी उपसंचालक किरण मोरे, क्रांती चौधरी, तंत्र अधिकारी शिल्पा गांगर्डे, अमृत गांगर्डे, प्रवीण गोरे, प्रकाश महाजन, प्रकाश आहेर, कौस्तुभ कराळे, पल्लवी लोहाळे आदी उपस्थित होते.

डॉ. विक्रम कड, श्री. विलास नलगे, राजाराम गायकवाड, प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ, शैलजा नावंदर, क्रांती चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले, तर आभार नीलेश कानवडे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या