अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील करोनाचा संसर्गाचा आलेख कमी झाला असला तरी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्यांवर
पालिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. यासह जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोव्हिड उपचार सेंटर, केअर सेंटर बंद झाली आहेत, त्या ठिकाणाची यंत्र सामुग्री सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद, महानगर पालिका, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल आणि विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटलच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोव्हिड चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबत दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांच्या कोव्हिड चाचण्या करण्यात याव्यात. करोना चाचणीची संख्या न वाढविणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून कोविड चाचणी किटची खरेदी करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर न करणार्यांवर जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्या यंत्रणेने पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले.