Saturday, September 14, 2024
Homeनाशिकसिन्नर तालुक्यात मका सोंगणीच्या कामांना प्रारंभ

सिन्नर तालुक्यात मका सोंगणीच्या कामांना प्रारंभ

पंचाळे । Panchale

- Advertisement -

मका पिकाचे तीन ते साडे तीन महिने वय झाल्याने सध्या सिन्नरच्या सर्वच भागात शेतकर्‍यांची मका सोंगणी कामाची लगबग सुरू झाली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग वादळाच्या निमित्ताने यावर्षी पावसाला सुरुवात झाली. निसर्ग वादळाच्या निमित्ताने झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, तुर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे.

हमी उत्पन्न मिळवून देणारे मका पीक असल्याने शेतकर्‍यांचा ओढा मका पीक घेण्याकडे यावर्षी वाढला आहे. कुकूटपालन व्यवसायासाठी मका पिकास मोठी मागणी असते. तसेच दूध व्यवसायामध्ये मुरघास करून जनावरांना चारा म्हणून मका पिक फायदेशीर आहे.

हे पीक साधारणतः 100 ते 110 दिवसामध्ये काढणीस येते. मशागत, खते, कीटकनाशके तसेच अल्प प्रमाणात झालेल्या लष्करी आळीच्या बंदोबस्तासाठी शेतकर्‍यांनी विविध कीटकनाशके व तण बंदोबस्तासाठी तणनाशकांचा संतुलित वापर केला.

त्यामुळे मक्याचे पीक यावर्षी जोमदार आले आहे. मका पिकास साधारणतः दीड हजार ते दोन हजार रुपये क्विंटल भाव मिळतो. सध्या मक्याच्या बिट्या वाढ पूर्ण झाल्याने पीक काढणीस आले आहे.

बिट्या मधील मक्याचे दाणे लाल सर झाल्यास पिक परिपक्व झाल्याचा संकेत मिळतो. त्यामुळे शेतकरी सध्या मका पीक सोंगणीच्या कामासाठी मजुरांच्या शोधात आहे.

यावर्षी मका काढणीसाठी एकरी चार हजार रुपये भाव आहे. यामध्ये मका बिट्या काढणे, मका ताटांची सोंगणी, चारा जमा करून त्याच्या पेंड्या बांधणे, त्याची गंजी करणे ही कामे चार हजार रुपयांमध्ये मजुरांना करावी लागतात.

तसेच रोजंदारीवर सोंगणीच्या एका दिवसासाठी अडीशे ते तीनशे रुपये मजुरी दर आहे. सध्या मजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी कुटुंबातील व्यक्तींकडून सोंगणी करण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने शालेय विद्यार्थ्यांचा उपयोगही शेतीकामासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.

मक्याच्या बिट्या व्यवस्थित कागदावर साठवून सवडीनुसार त्याचे धान्य काढता येत असल्याने पावसात भिजण्यापासून त्यावर प्लास्टिक कागद अथवा ताडपत्रीचा वापर करून बिट्या संरक्षण पावसापासून संरक्षण केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या