Friday, November 22, 2024
Homeनगरमनपातील लेट लतिफांना आयुक्तांचा दणका

मनपातील लेट लतिफांना आयुक्तांचा दणका

138 पैकी केवळ 16 कर्मचारीच मुख्यालयात हजर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेत उशिराने कामावर येणार्‍या लेट लतिफांना प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी मंगळवारी दणका दिला. सकाळी पावणेदहा वाजता 138 पैकी केवळ 16 कर्मचारीच मुख्यालयात हजर होते. त्यामुळे प्रशासकांनी मुख्य प्रवेशव्दार बंद करून घेत उशिराने आलेल्या 122 कर्मचार्‍यांची खरडपट्टी काढली. या सर्वांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, लेट लतिफांमध्ये सहा वरिष्ठ अधिकार्‍यांचाही समावेश असून त्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

प्रशासक डॉ. जावळे सकाळी साडेनऊ वाजता मनपाच्या मुख्य कार्यालयात हजर झाले. यावेळी केवळ 16 कर्मचारी हजर होते. त्यातही बारा शिपाई होते. त्यामुळे संतापलेल्या प्रशासकांनी सर्व विभागातील हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकली व प्रवेशव्दार बंद करून घेतले. उशिरा आलेल्या कर्मचार्‍यांना धारेवर धरले. काही वेळ सर्वांना कार्यालयाबाहेर उभे केले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, उशिराने आलेल्या शहर अभियंता, आस्थापना विभाग प्रमुखांनाही जावळे यांनी धारेवर धरले. यापुढे उशिराने कामावर आलेले आढळल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काही कर्मचारी त्यांना निश्चित केलेल्या गणवेशात नसल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सहा अधिकार्‍यांचा समावेश
लेट लतिफांमध्ये सहा वरिष्ठ अधिकार्‍यांचाही समावेश आहे. प्रशासक डॉ.पंकज जावळे महापालिकेत आल्यावर एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, तिन्ही उपायुक्त व आस्थापना विभाग प्रमुख यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे सर्व अधिकारी सकाळी 11 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास कार्यालयात दाखल झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या