Monday, September 14, 2026
Homeक्रीडाCWG 2026 : अपघातात हात गमावला, पण जिद्द सोडली नाही! नाशिकच्या दिलीप गावितचा...

CWG 2026 : अपघातात हात गमावला, पण जिद्द सोडली नाही! नाशिकच्या दिलीप गावितचा ऐतिहासिक पराक्रम; १०० मीटर शर्यतीत पटकावले सुवर्णपदक

नाशिक | Nashik

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ (कॉमनवेल्थ गेम्स) मध्ये भारतीय पॅरा-ॲथलीट्सनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. ग्लास्गो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर टी-४७ अंतिम शर्यतीत भारताने सुवर्ण आणि रौप्य अशा दोन्ही पदकांवर कब्जा केला. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यातील दिलीप महादू गावित (Dilip Gavit) याने १०.७१ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच शर्यतीत भारताच्या मोहम्मद बासिल मोर्सिंगानकथ याने १०.८३ सेकंदांच्या वेळेसह रौप्य, तर इंग्लंडच्या केविन सँटोसने (१०.८५ सेकंद) कांस्यपदक जिंकले. तसेच, पुरुषांच्या लांब उडी (Long Jump) प्रकारात मुरली श्रीशंकरने रौप्यपदक पटकावून भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला.

- Advertisement -

तीन सुवर्णपदकांसह भारताची पदकांची संख्या १४ वर

दिलीप गावितच्या या यशामुळे ग्लास्गोमध्ये पुन्हा एकदा भारताचे (India) राष्ट्रगीत अभिमानाने दुमदुमले. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी महिला वेटलिफ्टिंगमध्ये (४८ किलो गट) मीराबाई चानू आणि महिला गोळाफेक (एफ ५७ पॅरा ॲथलेटिक्स) प्रकारात शर्मिला धनकर यांनी सुवर्णपदक जिंकले होते. या तीन सुवर्णपदकांसह भारताच्या खात्यात आता ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य अशा एकूण १४ पदकांची नोंद झाली आहे. शिवाय बॉक्सिंगमध्येही भारतीय खेळाडूंनी १० पदके निश्चित केली आहेत.

अपघातात हात गमावला, पण जिद्द सोडली नाही!

दिलीप गावितची इथपर्यंतची वाटचाल अत्यंत संघर्षमय राहिली आहे. वयाच्या पाचव्या वर्षी झालेल्या एका अपघातात (Accident) आणि योग्य वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे त्याला उजवा हात गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर नैराश्यात गेलेला दिलीप शेळ्या-मेंढ्यांच्या मागे धावणे आणि मित्रांसोबत भटकण्यात दिवस घालवत होता. परंतु, अलंगुण येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालयात शिकत असताना वर्गशिक्षकांनी त्याचे नाव मैदानी स्पर्धेत नोंदवले. तेथे क्रीडा मार्गदर्शक वैजनाथ काळे यांनी दिलीपमधील असामान्य कौशल्य आणि जिद्द ओळखली. अत्यंत गरिबीत जगणार्‍या दिलीपच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळे सरांनी त्याला दत्तक घेतले आणि आपल्या ‘व्हीडीके स्पोर्ट्स फाउंडेशन’च्या माध्यमातून त्याला प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्र्यंबक रोडवरील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर दोन वर्षे सराव केल्यानंतर दिलीपचे कौशल्य अधिक उजळत गेले.

जागतिक व्यासपीठावर छाप

दिलीपने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवला आहे. २०२३ मध्ये झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत टी-४७ गटातील ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. हे पदक भारताचे पॅरा आशियाई स्पर्धेतील १०० वे ऐतिहासिक पदक ठरले होते. तसेच २०१९ खेलो इंडिया पुणे येथे झालेल्या स्पर्धेत त्याने महाराष्ट्र संघाकडून खेळताना ४×४०० मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.

ताज्या बातम्या

संपादकीय : १४ सप्टेंबर २०२६ – श्री विघ्नहर्त्याच्या आगमनाचा संदेश

0
आज विघ्नहर्ता आणि बुद्धिदेवता श्री गणेशाचे मंगलमय आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनाने घराघरांत उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ढोल-ताशांचा निनाद, आरास,...