डॉक्टर आणि रुग्ण परस्पर संबंध हा चर्चेचा विषय आहे. या विषयाला खतपाणी घालणार्या घटना अधूनमधून घडत असतात. रुग्णांचा विश्वास डॉक्टरांनी जपण्याची गरज पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Padmashri Dr. Tatya Rao lahane) यांनी व्यक्त केली. रुग्णाला त्याचा फॅमिली डॉक्टर हा अत्यंत जवळचा वाटतो. त्यामुळे रुग्णांचा विश्वास जपणे ही त्यांची महत्वाची जबाबदारी आहे असेही डॉ. लहाने म्हणाले. नाशिकमध्ये फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. लहाने यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला.
डॉक्टर आणि रुग्णामधील परस्पर विश्वास हा सध्या कळीचा मुद्दा आहे. तो विश्वास धोक्यात येत आहे का? रुग्णालयात दाखल केलेल्या एखाद्या रुग्णाचा मृत्यू वादाच्या भोवर्यात सापडतो. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप डॉक्टरांवर करुन त्या रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात गोंधळ घालतात. साहित्याची मोडतोड करतात. प्रसंगी डॉक्टरांनाही मारहाण केली जाते. तर उपचार योग्य पद्धतीने सुरु होते असे संबंधित डॉक्टरांचे म्हणणे असते. वैद्यकीय उपचार कमालीचे महागडे होत आहेत. डॉक्टर आपल्याला चाचण्यांच्या चक्रव्युहात अडकवतात अशी रुग्णांची भावना असते. तर डॉक्टरांवर अविश्वास दर्शवणार्या घटनांमध्ये वाढ झाल्याने डॉक्टरही चाचण्यांचा आधार घेताना आणि चाचण्यांच्या अहवालानुसार उपचार करताना आढळतात.
दिवसेदिवस महागडे होत चाललेले वैद्यकीय शिक्षण, खर्चिक वैद्यकीय उपचार आणि रुग्णालय पायाभूत सुविधा उभारणीसाठी येणारा खर्च याही बाबी विसंवादाला कारणीभूत ठरत असतील का? डॉक्टरांनी पुरेसा वेळ दिला नाही अशीही रुग्णांची तक्रार असते. डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय सुरु करण्यापूर्वी शपथ घेतलेली असते. त्यानुसारच डॉक्टर काम करतात आणि प्रत्येक रुग्णावर यशस्वी उपचार करण्याचा प्रयत्न करतात अशी भूमिका डॉक्टर मांडतात. तरीही डॉक्टर-रुग्ण परस्पर विश्वास अविश्वासात का बदलतो? याचा विचार डॉक्टर आणि रुग्ण यांनी करायला हवा. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरला देवासमान मानतात. तथापि त्याचा अतिरेक योग्य नाही हे लक्षात घेतले जायला हवे.
पूर्वी प्रत्येक कुटुंबाचे एक डॉक्टर ठरलेले असायचे. आजही काही प्रमाणात आहेत. ते कुटुंबाचे फक्त डॉक्टरच नसायचे, तर सल्लागार, मार्गदर्शक, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती अशा बर्याच भूमिका पार पाडायचे. त्यांच्याकडे येणार्या रुग्णांना पुरेसा वेळ द्यायचे. रुग्णांशी संवाद साधून त्यांच्यावरचा ताण हलका करायचे. त्यामुळेच ‘आमच्या डॉक्टरकडे नुसते गेले तरी निम्मे दुखणे कमी होते’ असे म्हटले जायचे. आता काळ बदलला आहे. डॉक्टरही व्यस्त झाले आहेत. तथापि फॅमिली डॉक्टर लोकांना आपलेसे का वाटायचे त्यातील मर्म डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवे. काळानुसार त्यांची भूमिका बदलली तरी त्यामागचा मूळ हेतू हरवू नये.
उपचारांमधील पारदर्शकता जपणे, उपचारांची दिशा समजावून सांगणे, रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना पुरेसा वेळ देऊन त्यांना विश्वासात घेण्याची भूमिका रुग्णाचा विश्वास जपू शकते. नवनवे आजार वाढत आहेत. रुग्णालये गर्दीने ओसंडून वाहात आहेत. त्याप्रमाणात डॉक्टरही व्यस्त होणार. शिवाय प्रत्येक रुग्ण बराच व्हावा, डॉक्टरांनी माफक दरात उपचार करावेत अशी नातेवाईकांची अपेक्षा असणे स्वाभाविक. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि रुग्ण परस्पर सौहार्द जपण्यासाठी सुवर्णमध्य साधणेच समाजाच्या अंतिमत: हिताचे आहे. डॉ. लहाने यांनाही कदाचित तेच सुचवायचे असावे.