नाशिक | प्रतिनिधी
नामपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची यादी अनधिकृतपणे सोशल मीडियात व्हायरल केल्यामुळे चार ग्रुपवर जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे सोशल मीडियात सक्रीय असलेल्या व्हाॅटसअॅप ग्रुप आणि अॅडमीन्सचे धाबे दणाणले आहे.
बागलाण तालुक्यातील नामपूर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारयास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात मोसम खोऱ्यातील कोणकोणते रुग्ण आले याबाबतची माहिती आरोग्य सेवकांकडून गोळा करण्यात आली. यातील रुग्णांची नावे आणि पत्ता असलेली जवळपास १८० पेक्षा अधिक रुग्णांची यादी सोशल मीडियात व्हायरल झाली होती.
यादी व्हायरल करून परिसरात भीती पसरवली यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व्हाॅटसअॅपच्या चार ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे.
अजूनही ग्रामीणचे सायबर पोलीस अशा घटनांवर लक्ष ठेवून असून असे कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.