बेशिस्त वाहतूक ही संपूर्ण राज्याची डोकेदुखी झाली आहे. ठिकाठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांनी जाम झालेले रस्ते, कोलमडलेली वाहतूक, कर्कश्य आवाजात वाजणारे हॉर्न आणि या गोंधळात जीव वाचवत चालण्यासाठी कसाबसा मार्ग शोधणारे पादचारी यावर आता कोणत्याही एका शहराची मक्तेदारी राहिलेली नाही, इतके हे राज्याच्या सर्व शहरांतील सामान्य दृश्य झाले आहे. फक्त वाहतुकीचेच नव्हे तर कोणताही नियम पाळण्यासाठी नसतो असाच लोकांचा भ्रम झाला असावा. नव्हे नियम मोडणेच अंगवळणी पडले असावे. बेशिस्त हाच अधिकार वाटू लागला असावा. त्यामुळेच की काय, वाहतुकीच्या नियमांची एैशीतैशी करुन वाहनांचे घोडे वेगात दौडतात. वाहनचालकांना इतरांच्या जीवाची तर सोडाच पण स्वत:च्याही जीवाची पर्वा नसते. नाशिक शहराचे उदाहरण घेता येऊ शकेल. बेशिस्त वाहनचालकांनी शहरातील वाहतुकीचे एकेरी मार्ग शिल्लकच ठेवलेले नाहीत. सगळेच रस्ते दुहेरी केले आहेत. सिग्नलवर काही सेकंद थांबायची सुद्धा अनेकांची तयारी नसते. सर्वच वाहनचालकांना दुसर्या वाहनचालकाच्या फक्त पुढे जायचे असते. त्यासाठी शक्य त्या सगळ्या कसरती केल्या जातात. एवढेच कशाला उड्डाणपूलावरील वाहतूक सुद्धा बेशिस्त वाहनचालकांनी अपवाद ठेवलेली नाही. गरज असो अथवा नसो, कर्कश्य आवाजात वाजणारे हॉर्न ही नवीच समस्या आहे. रस्ते अपघातांची संख्या आणि त्यात बळी जाणार्यांचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरे मात्र बदनाम होत आहेत. खड्डेमय, अरुंद आणि चिंचोळे रस्ते ही देखील वाहतूक जामची काही कारणे. तथापि सदासर्वकाळ वाहतुकीचा बोजवारा उडण्याचे बेशिस्त हे एक प्रमुख कारण कोणीच नाकारु शकत नाही. प्रशासकीय पातळीवर वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जातात. नियमभंगाबद्दल दंड केला जातो. आवश्यकतेनुसार उड्डाणपूल बांधले जातात. काही ठिकाणी वळणरस्ते तयार केले जातात. नियम फलक लावले जातात. नियमपालनाची सक्ती करणार्या शासकीय सेवकांची कार्यपद्धती अनेकदा वादग्रस्त ठरते हा भाग अलाहिदा. सिग्नल बंद आहेत, रस्ते दर्जेदार नाहीत, सिग्नल बसवलेले नाहीत किंवा नियमफलक दिसत नाहीत अशा अनेक तक्रारी नागरिक करतात. या तक्रारींचे निराकरण व्हायलाच हवे. पण तसे झाले तरी नियम पाळले जातील याची खात्री कोणी तरी देऊ शकेल का? मुळात शिस्तपालनाची सक्ती करण्याची वेळ प्रशासनावर का यावी? सुरक्षित वाहतूक ही वाहनचालकांची देखील जबाबदारी आहे आणि नियम पालनासाठी असतात याचे सामाजिक भान कधी येणार? परदेशातील रस्ते आणि वाहतुकीचे नेहमीच कौतुक केले जाते. पण तो लौकीक राखण्यात तेथील सुजाण नागरिकच आघाडीवर असतात याचा मात्र सोयीस्कर विसर पडतो. परदेशस्थ वाहतुकीच्या शिस्तीचे कौतुक करणारे, आपापल्या शहरात मात्र नियमांकडे सर्रास कानाडोळा करतात. वाहतूक चालवण्याचा परवाना देण्याच्या पातळीवर बेशिस्तीला काही प्रमाणात आळा घातला जाण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतात. पण त्या प्रणालीविषयी अधिक न बोललेलेच बरे ठरेल का? नियमांचे पालन करणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. सक्तीने शिस्तपालनाचे धडे गिरवायचे नसतील तर ते स्वेच्छेने गिरवणेच हिताचे ठरेल एवढे जरी लोकांच्या लक्षात आले तरी वाहतुकीतील बेशिस्त थोडीतरी कमी होऊ शकेल.