नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्यातल्या उद्योजकांसाठी (सीडीसीपीआर) सर्व समावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 चार वर्षानंतर पुन्हा सुरु करण्यात आल्याने त्याचा उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री व दोघा उपमुख्यमंंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.15) होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी सांगितले.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नाशकात होणार्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सामंत यांनी पत्रकार परिषदेत उद्योग क्षेत्राबाबत माहिती देतांना सांगितले की, आगामी काळात सरकारच्या धोरणामुळे नाशिकच्या उद्योजकांवर सुगीचे दिवस येणार असून नाशकात जागा वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. शासनाने राबवलेल्या आयटी पॉलिसीमुळे देशात याची चांगली चर्चा झाली असून सदरहू पॉलिसी जाहीर होताच बजाज या कंपनीने तब्बल 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुण्यात केली आहे. तसेच देश-विदेशातील उद्योजक देखील आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत.
2014 सालात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सुरू केली होती. मात्र ठाकरे सरकार काळात सदरहू योजना बंद अवस्थेत होती. ही योजना आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आधी दोन पक्षांचे सरकार होते, आता त्यात तिसरा पक्ष सामील झाला असून मंत्रीपदावरून आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नाहीत. शिवसेनेकडे देखील अनेक महत्त्वाची खाते असून अजितदादांना अर्थ खाते दिल्याने त्याबाबत आमच्या कोणामध्येही नाराजी नाही. विरोधक मात्र लोकांमध्ये याबाबत गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी निमा अध्यक्ष धनंजय बेळे, उद्योजक राजेंद्र आहिरे, राजेंद्र पानसरे, गोविंद झा, श्रीकांत पाटील, राजेंद्र वडनेरे, रविंद्र झोपे आदी उपस्थित होते.