Sunday, October 6, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २१ जून २०२४ - श्रवणशक्ती असूनही बहिरे झालेल्यांचे काय?

संपादकीय : २१ जून २०२४ – श्रवणशक्ती असूनही बहिरे झालेल्यांचे काय?

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना अचानक आलेल्या बहिरेपणामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अजून या धक्क्यातून सावरलेलो नाहीत असे त्यांनी समाजमाध्यमावर सांगितले. त्यांना कोणत्या आजाराने गाठले? त्यावर उपाय आहेत का? त्यांना पुन्हा पहिल्यासारखे ऐकू येईल का? त्यांना झालेला त्रास दुर्मीळ असल्याचे सांगितले जात असले तरी तसा त्रास कोणाकोणाला जाणवू शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा मजकूर समाजमाध्यमांवर भरभरून वाहतो आहे.

याविषयी लोक जेवढे अवगत झालेले असतील तेवढे कदाचित याज्ञिक यांनाही माहित नसू शकेल. त्यांना झालेल्या व्याधीचा समग्र परिचय त्यांच्या चाहत्यांना आत्तापर्यंत झालेला असावा. या सगळ्या गदारोळात त्यांनी केलेले आवाहन किती लोकांपर्यंत पोहोचले असावे? मोठ्या आवाजात संगीत न ऐकण्याचा आणि हेडफोनचा कमी वापर करण्याचा सल्ला त्यांनी समाजाला दिला आहे. त्यांनी एका गंभीर समस्येला हात घातला आहे.

- Advertisement -

बहिरेपणावर कदाचित उपाय होऊन अलका बर्‍या होतीलही पण हेडफोन्स वापराच्या अतिरेकी वापरामुळे श्रवणशक्ती असूनही बहिरे होत चाललेल्या व्यक्तींचे काय? बहुसंख्य माणसे हेडफोन कानात कोंबुनच घराबाहेर पडतात. कोणतीही क्रिया करताना, जसे की चालताना, व्यायाम करताना, जेवताना कानात हेडफोन्स असलेच पाहिजेत असा जणू अलिखित नियम बनला असावा. अशी माणसे चालती फिरती यंत्रमानवच वाटतात.

ज्यांना त्यांच्या भोवतालचे अजिबात भान नसते. कानात हेडफोन्स घालून वावरत असल्याने त्यांना बाहेरचे काहीच ऐकू येत नाही. त्यांचे अवधान सुटलेले असते अशी परिस्थिती कोणतेही संकट त्यांच्यासमोर उभे ठाकण्यासाठी पूरक ठरू शकते. त्याच्या अति वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या त्यांना भेडसावू शकतात. अनेकांना कायमचे अथवा थोडेसे बहिरेपण येऊ शकते. अजूनही कृत्रिम कान तयार करण्यात विज्ञानाला यश आलेले नाही.

परिणामी कायमचे बहिरेपण वाट्याला येऊ शकते. तथापि धोका तेवढाच नाही. हेडफोन्सने कान बंद करून वावरणारी माणसे कोणत्याही अपघातात सापडू शकतात. कारण त्यांचे अवधान सुटलेले असते. शेजारी काय घडते आहे याचे याची जाणीव देखील त्यांना होत नाही. प्रसंगी अशी माणसे त्यांचा जीव देखील गमावू शकतात किंवा कायमचे जायबंदी होऊ शकतात. अशा घटना अधूनमधून घडतात आणि माध्यमात प्रसिद्धही होतात. ‘स्वमग्नता’ हा एक आजार आहे. तथापि हेडफोन्सच्या मदतीने कान बंद करून स्वखुशीने स्वमग्नता पत्करणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती चिंताजनक आहे.

कान कायमचे बंद होऊ नयेत असे वाटत असेल तर यावर जागरूकता हाच एकमेव उपाय आहे. जो ज्याचा त्याने अंमलात आणायचा आहे. ज्याच्या त्याच्या कानाची काळजी ज्याने त्यानेच घ्यायला हवी. ती दुसरा कशी घेऊ शकेल? कान सुस्थितीत ठेवायचे असतील तर हेडफोन्सचा अति वापर टाळणे, कानठळ्या बसेल अशा आवाजात संगीत न ऐकणे, अपरिहार्य असले तर तज्ज्ञांच्या मदतीने काळजी घेणे हे उपाय तज्ज्ञ सांगतात. ते अमलात आणणे ही लोकांचीच जबाबदारी आहे. अलका यांच्या पोस्टमुळे लोक खडबडून जागे झाले असावेत. लोकांनी त्यातून बोध घ्यावा ही अपेक्षा.

- Advertisment -

ताज्या बातम्या