Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याशिव महापुराण कथा महोत्सवाची सांगता; भाविकांनी घडवले संयम, स्वयंशिस्तीचे दर्शन

शिव महापुराण कथा महोत्सवाची सांगता; भाविकांनी घडवले संयम, स्वयंशिस्तीचे दर्शन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

येथील कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या पुण्यश्री शिव महापुराण कथा महोत्सवाची ( Shri Shivmahapuran Katha Mahotsav) आज सांगता होताच 5 लाखावर महिला, पुरूष भाविकांनी आपल्या घराकडे मार्गस्थ झाल्याने कॉलेज मैदान-कॅम्परोडसह शहरातील सर्व रस्ते चार तासापेक्षा अधिक वेळ भाविक व वाहनांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले होते. अभुतपुर्व भाविकांचा जनसागर रस्त्यावर उसळला असला तरी शिस्त व संयमाचे अनोखे दर्शन यावेळी घडून आले.

कुठेही गोंधळ-अथवा चेंगराचेंगरी न होता शहरासह बाहेर गावातील भाविक मार्गस्थ झाल्याने कथा समितीसह पोलीस-प्रशासन यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे कथा श्रवणानंतर भाविक परतणार असल्याने त्यांची गैरसोय होवून वाहतूक कोंडी होवू नये यासाठी मालेगावकरांनी देखील आज पहाटेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत आपली दुचाकी, कार आदी वाहने रस्त्यावर आणली नव्हती. या समयसुचकतेमुळे देखील प्रमुख मार्ग भाविकांना जाण्यासाठी जवळपास मोकळे राहिले होते.

शिव महापुराण कथेची आज सांगता असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी राहण्याची व्यक्त केली जात असलेली शक्यता पहाटे 4 वाजेपासूनच भाविकांचे जत्थे मिळेल त्या वाहनाने मालेगावी दाखल होत असल्याने खरी ठरली. पार्किंगसाठी उभारलेले 15 वाहनतळ वाहनांच्या गर्दीने तुडूंब भरले होते. रस्त्यावर तसेच सोसायटी भागात देखील भाविकांनी वाहने उभी केली होती. शेवटच्या दिवसाच्या कथा श्रवणाच्या लाभासाठी भाविक थांबून राहिल्याने कथास्थळाबरोबरच रस्त्यांवर देखील अभुतपुर्व गर्दी झाली होती.

पहाटे 5 वाजेपासून दाखल होत असलेल्या भाविकांमुळे मैदानात बसण्यास जागा राहिली नसल्याने भाविकांनी रस्त्यावर ठान मांडले होते. 5 लाखावर असलेले हे भाविक सुखरूपरित्या घरी पोहचावेत या दृष्टीकोनातून अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक प्रदिपकुमार जाधव, सहाय्यक पोलीस अधिक्षक तेगबीरसिंग संधू यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, पोलिसांनी उपाययोजना केल्या होत्या. रस्त्यांवर मोकाट जनावरे येणार नाहीत याची दक्षता घेतली गेली. पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवक भाविक देखील पुढे सरसावले होते.

दुपारी 12 वाजता कथेची सांगता झाल्यानंतर भाविकांनी परतण्यास प्रारंभ केल्याने कॅम्परोड, कॉलेजरोड, साठफुटी रोड, सटाणारोड, संगमेश्वर, जुना आग्रारोड आदी प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बाहेरगावी जाण्यासाठी हजारोच्या संख्येने महिला, पुरूष भाविक नवीन व जुन्या बसस्थानकाकडे मार्गस्थ झाल्याने या रस्त्यावर गर्दीचा उच्चांक दिसून आला.

पार्किंगमधून वाहनातून देखील भाविक बाहेर पडल्याने सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र अभुतपुर्व गर्दी होवून सुध्दा भाविक अत्यंत शांततेने श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करत शिस्तीत मार्गस्थ होत असल्याचे दिसून आले. कुठेही चेंगराचेंगरी अथवा वाहतूक कोंडीचा प्रकार घडला नाही. तब्बल चार तासानंतर रस्त्यांवरील भाविकांची गर्दी ओसरल्याने समितीसह पोलीस प्रशासन यंत्रणेस दिलासा मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या