नाशिक । प्रतिनिधी
राज्य सरकारच्या नव्या अधिसुचनेनुसार जिल्ह्यातील १७ कंटेंनमेंट क्षेत्र वगळून शहर व जिल्ह्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेत अटी – शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
त्यात प्रामुख्याने शेती व निगडित व्यवसाय, मनरेगाची कामे, बांधकाम क्षेत्र, अौदयोगिक वसाहत, प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि वाहतूक सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थच्रक गतिमान होईल,असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.
देशभरात येत्या ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला असला तरी सोमवारपासून (दि.२०) ठप्प झालेली अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. राज्य शा सनाने काढलेल्या नव्या अधिसुचनेनुसार जिल्ह्यात मालेगाव, नाशिक, सिन्नर, बागलाण, चांदवड या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने जे कंटेंनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात सुधारित आदेशानुसार कामकाज सुरु होणार आहे.
नाशिक शहरातील बांधकामांना सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी त्यांना अन्य जिल्ह्यातुन तसेच कंटेंनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या ठिकाणाहून मजूर, कारागीर यांची ने आण करता येणार नाही. एमआयडीसीतील उद्योगांनाही हाच नियम लागू असणार आहे. उदयोग सुरु करण्यासाठी कंपनी मालकांना एमआयडीसीच्या संकेतस्थळावर तशी आॅनलाइन नोंद करावी लागणार आहे.
तसेच कामगार, कर्मचारी यांना सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे हे अनिवार्य असणार आहे. तसे मात्र, लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळतील. जिल्हा प्रशासनाकडून सेवा सुरु करण्यासाठी आॅनलाईन परवानगी दिली जाणार आहे.
हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ,मत्स्य व्यवसाय,इंडस्ट्री (प्रतिबंध क्षेत्र वगळून ), जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रक्सचे गॅरेज, शेती संबंधीची सर्व कामे, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकाने, सिचन प्रकल्प मनरेगाची कामे, डिजिटल व्यवहार, आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स ( ५० टक्के कर्मचारी ), कुरिअर सेवा, आॅनलाईन शिक्षण, सरकारी कार्यालये, आरोग्य सेवा आॅनलाईन शिक्षण, सरकारी कार्यालये, आरोग्य सेवा, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे हॉटेल्स, मोटेल्स,प्लम्बर्स,
मोटार मेकनिक्स, फळे आणि फुले यासंबंधित प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि वाहतूक सेवा सुरू राहणार. आय टी सुविधा देणारे कर्मचारी लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित ठेवून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील.
हे बंदच राहणार
सिनेमागृहे आणि मॉल्स ,जिम , स्विमिंग पूल्स थिएटर्स , स्पोर्टस सेंटर्स, हॉस्पिटॅलिटी सेवा ,बार – परमीट रूम सामाजिक ,जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत रस्ते व प्रवास, रेल्वे आणि विमान प्रवासी वाहतूक, रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस, शाळा, महाविद्यालये आणि सर्व शिक्षण संस्था,कोचिंग क्लासेस हे सर्व बंद राहणार आहे.
गर्दीला परवानगी नाही
जिल्ह्यातील सर्व धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी दिली जाणार नाही.
करोना संकटातून आपण अजुनही बाहेर पडलो नाही. पण अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनमध्ये सवलती दिल्या आहे. हा विश्वास सार्थ ठरवत प्रत्येकाने शिस्त पाळावी. जेणेकरुन नविन कंटेंनमेंट क्षेत्र तयार होणार नाही. शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून दहा टक्के उपस्थिती केली जाणार आहे. त्यामुळे कामकाजाचा वेग वाढणार आहे. ज्या उद्योग सेवा सुरु होणार हे त्यांना आॅनलाईन परवानगी दिली जाईल. त्यासाठी आॅनलाईन पोर्टल तयार केले जाईल.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.