Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedछत्रपती संभाजीनगरात बालरोग तज्ज्ञांची परिषद

छत्रपती संभाजीनगरात बालरोग तज्ज्ञांची परिषद

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

येत्या ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये संसर्गजन्य आजारांवरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

- Advertisement -

८ सप्टेंबर रोजी परिषदेच्या पूर्वसंध्येला तीन विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिली कार्यशाळा लसीकरण व त्याचा शास्त्रोक्त वापर यावर आधारित असणार आहे. तसेच इतर दोन कार्यशाळांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या उपचारांच्या दरम्यान करावयाच्या तपासण्यांवर व प्रतिजैविकांचा (अँटीबायोटिक्स) सुयोग्य वापरावर शास्त्रीय उहापोह मार्गदर्शन केले जाईल. 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ९ सप्टेंबर रोजी उदघाटनाचा कार्यक्रम होईल. परिषदेचे उदघाटन आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मोर्ताडा (इजिप्त) यांच्या हस्ते होईल. यावेळी आयएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. किंजवडेकर, भावी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बसवराज, राष्ट्रीय सचिव डॉ. विनीत सक्सेना, आयएपी संसर्गजन्य आजार शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. खळतकर, सचिव डॉ. शेणॉय, महाराष्ट्र आयएपीचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. अमोल पवार व मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी आंतराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष, इजिप्तचे डॉ. मोर्ताडा यांचे ‘भविष्यातील बुरशीजन्य आजार व त्यांचे आव्हान’ या महत्त्वपूर्ण विषयावर बीजभाषण होणार आहे.  तसेच दोन्ही दिवशी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वक्ते विविध संसर्गजन्य आजार; जसे- जिवाणू / विषाणूजन्य आजार, मूत्रमार्गाचे, मेंदूचे, नवजात अर्भकाचे संसर्गजन्य आजार, इतर प्रकारचे आजार तसेच त्यांचे उपचार, निदान व प्रतिबंध यावर सविस्तर मार्गदर्शन, पॅनल चर्चा, संवाद यामधून उपस्थित सहभागी ज्ञानार्थी डॉक्टरांना मार्गदर्शन करतील.

या परिषदेत छत्रपती संभाजीनगरातील अनेक बालरोग तज्ज्ञ सहभागी होणार असून हा या शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या परिषदेत सहाशे ते सातशे डॉक्टर्स ज्ञानवर्धनासाठी संपूर्ण भारतभरातून सहभागी होणार आहेत. तसेच जवळपास दीडशे तज्ञ मार्गदर्शक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वक्त्यांचा सहभाग राहणार आहे. अशा प्रकारची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बालरोग तज्ञांची परिषद छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथमच होत आहे. 

या परिषदेच्या आयोजनात आयोजन अध्यक्ष डॉ. गणेश कुलकर्णी व आयोजन सचिव डॉ. निखिल पाठक यांच्यासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर आयएपी शाखा व आयोजन समितीने केले आहे. यावेळी डॉ. प्रशांत जाधव यांची उपस्थिती होती.१० सप्टेंबर रोजी या परिषदेचा समारोप होईल.      

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या