दिल्ली l Delhi
ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला अखेर 32 वर्षानंतर पहिल्यांदा ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बामध्ये (Gabba) पराभव स्वीकारावा लागला. अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेच्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात अजिंक्य रहाणेच्या 3 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर दिग्गजांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाबद्दल ट्विट करताना लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कटता सर्वत्र दिसून आली. त्यांचा उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प होता. संघाचे अभिनंदन! आपल्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’
आयसीसीचे माजी अध्यक्ष व खा. शरद पवार यांनी देखील टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. शरद पवार यांनी म्हंटले आहे की, ‘गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला.’
तसेच मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे खेळायचे याच्या कक्षा आपण आणखी रुंदावल्या. आपण दुखापत आणि अनिश्चिततेला संयम आणि आत्मविश्वासाने प्रत्युत्तर दिले. हा विजय ऐतिहासिक आहे, असे सचिन तेंडुलकर याने ट्विट करुन म्हटले.
भारतीय संघ अव्वल स्थानावर..
या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही ७३.८ एवढी होती, तर भारताची ७०.२ एवढी होती. न्यूझीलंडचा संघ यावेळी ७० टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर होता. पण भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी जिंकली. त्यामुळे भारताच्या विजयाची टक्केवारी ७१.६ एवढी झाली असून त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. पण पराभवानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाची चांगलीच घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहेच, पण त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. कारण या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची विजयीच टक्केवारी ही ६९.२ एवढी झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड आता दुसऱ्या स्थानावर ७० टक्क्यांसह असून ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे या पराभवानंतर भारतीय संघाला अव्वल स्थानाचे चांगले गिफ्ट मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.