दिल्ली । Delhi
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ही मागणी केली. हल्ल्याविरोधात देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचा निर्णायक आवाज संसदेत उमटावा, यासाठी हे अधिवेशन बोलावणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
२२ एप्रिल रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये झालेल्या गोळीबारात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत एकतेचा संदेश देण्यासाठी आणि ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
खर्गे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, “हा हल्ला केवळ एका भागावरील नव्हे, तर देशाच्या एकात्मतेवरील हल्ला आहे. याला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे लागेल.” संसद ही लोकशाहीचा सर्वोच्च मंच असून, अशा प्रसंगी तिच्यातूनच ठोस निर्णय घ्यावेत, असे काँग्रेसचे मत आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेले खर्गे आणि राहुल गांधी यांनी संयुक्तपणे या पत्रात सरकारला तातडीने अधिवेशन घेण्याची विनंती केली आहे. त्यात, “दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज असून, त्यासाठी सामूहिक संकल्प महत्त्वाचा आहे,” असे म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हे पत्र ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. त्यांनी लिहिले की, “संकटकाळात संसदेला गप्प बसता येणार नाही. जनतेच्या भावना संसदेत उमटायला हव्यात. त्यामुळे काँग्रेसने ही जबाबदारीची भूमिका घेतली आहे.”
हल्ल्यानंतर देशात सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विस्तृत चर्चा होणे आवश्यक आहे. काँग्रेसने अधिवेशनाद्वारे राष्ट्रीय सुरक्षेची रणनीती, गुप्तचर यंत्रणांचे अपयश आणि भविष्यातील धोरणांवर सुस्पष्ट चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून या मागणीला कोणती प्रतिक्रिया मिळते, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.