मुंबई | Mumbai
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 22 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होता. आज संग्राम थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कूल, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाकडून सातत्याने झालेले दुर्लक्ष, विधानसभा अध्यक्ष, राज्य मंत्रिमंडळात वेळोवेळी डावलले गेले आणि विधानसभेत झालेला पराभव तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याला मिळत नसलेले कर्ज यामुळे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपची वाट धरली आहे.
भाजपात प्रवेश केल्यानंतर संग्राम थोपटे म्हणाले, “संग्राम थोपटे काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मी भूमिका जाहीर केल्यावर अखेर त्यावर पडदा पडला. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला तुम्ही काँग्रेस का सोडताय? खरेतर ही वेळ मला काँग्रेसनेच आणली. विखे-पाटील सांगायचे मला, निर्णय घे…निर्णय घे…भाजपचे सुद्धा…पण, मी सांगायचो, ‘निर्णय नाही घेता येणार…’ मी विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्याने निर्णय घेत नव्हतो.”विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल काही कारणामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले.
संग्राम थोपटे पुढे म्हणाले की, लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला होता. काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले. मात्र त्या निष्ठेचे फळ मिळाले नाही. तळागाळात काँग्रेस वाढविण्याचा काम आम्ही केले. थोडेसे दुःख वाटतेय, खंत वाटते. काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला आणि आज या निर्णयावर पोहोचलो आहे. भाजप देशाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असणारा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची चालणारी वाटचाल पाहता सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा पक्षप्रवेश करत आहे, असे त्यांनी म्हटले.
“विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. मी निष्ठा राखून ज्या पक्षाचे काम केले, त्या निष्ठेचे काहीच फळ मला मिळाले नाही. मी आणि वडिलांनी अनेक वर्षे संघर्ष केला. संघर्ष करायला लागत असल्याने आम्ही डगमगलो नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीत एकहाती सत्ता मिळण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या काळाता आम्ही जो पक्ष तळागळापर्यंत वाढवला, पण नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागला,” असे थोपटे यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा