महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंमधील जवळीक आणि संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या जीआर रद्द झाल्यानंतर विजयी मेळाव्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले होते.
यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर ‘मातोश्री’वर पोहोचले. या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चांना आता काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांच्या वक्तव्याने आणखी बळ मिळाले आहे.
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवासी कार्यशाळेत रमेश चेन्नीथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चेन्नीथला म्हणाले, “दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात कोणतीही अडचण नाही. आगामी निवडणुकीत त्यांच्यात युती होईल की नाही, हे आम्हाला माहीत नाही. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याला आमचा विरोध नाही.” या वक्तव्यमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
चेन्नीथला यांनी पुढे स्पष्ट केले की, राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा (एमव्हीए) भाग नाहीत. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा झाली असेल, तर ती आमच्या माहितीत नाही. पण दोन्ही नेते एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात काही हरकत नाही. याबाबत आम्ही महाविकास आघाडीच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करू,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या कार्यशाळेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. “आता फक्त अॅक्शन, अॅक्शन आणि अॅक्शन,” असा मंत्र देत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास येईल.
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात येणार का, आणि त्याला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.




