मुंबई | Mumbai
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज (Jagadguru Narendracharya Maharaj) यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरून विविध स्तरातून टीका केली जातं आहे. तसेच आज नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन केले. यावेळी नाशिकमध्ये देखील हिंदू संघटनांनी वडेट्टीवार यांनी माफी मागावी असे म्हणत त्यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केले.
नाशिकमध्ये ‘श्री स्वरूप संप्रदायाच्या’ वतीने अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय वडेट्टीवार यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारण्यात आले. तसेच विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा परिणामाला समोर जावे असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला असता याठिकाणी आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी सदर मोर्चात सहभागी होऊन आंदोलनास पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे वडेट्टीवार यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी परिसरातील सुमारे २०० ते २५० लोक सहभागी झाले होते.
दरम्यान, स्वता:नरेंद्र महाराज यांनी देखील या वक्तव्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच मुंबई उपनगर, पुणे, पंढरपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर यासह विविध ठिकाणी विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलन (Agitation) करण्यात आले. त्यामुळे आता यासर्व प्रकरणावर विजय वडेट्टीवार नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते?
काँग्रेसचे आमदार तथा विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ‘मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे असे महाराज होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांकडून संताप व्यक्त केला जात असून वडेट्टीवार यांच्याविरोधात आज राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.