मुंबई | Mumbai
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषद आणि त्याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) काही आमदारांवर (MLA) ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामध्ये आमदार हिरामण खोसकर, झिशान सिद्दिकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केली आहे त्यांना आगामी विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे या आमदारांमध्ये चलबिचल झाली होती.
हे देखील वाचा : Pankaja Munde : “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, आता आपला डाव खेळणार”; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निर्धार
अशातच आता या ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्या आमदारांमध्ये समावेश असलेल्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके (MLA Sulabha Khodke) यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खोडके यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. दुसरीकडे या निलंबनानंतर उद्या (रविवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Manoj Jarange Patil : “मला चारही बाजूने घेरलं, माझ्या समाजाला…”; जरांगेंचा नारायण गडावरून सरकारवर निशाणा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांसह काही आमदार व खासदारांनी शिवसेना आणि भाजप (Shivsena and BJP) यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत जास्त जवळीक वाढल्याची चर्चा होती. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारात त्या कुठेही दिसल्या नव्हत्या. त्यामुळे आमदार खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांनी आणखी जोर धरला होता. त्यावर अखेर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा