मुंबई | Mumbai
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) इतरांना उद्देशून गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. अशातच आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी चंद्रपूरमध्ये बोलतांना गुढीपाडव्याबाबत (Gudhi Padwa) एक विधान करत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, “मी गुढी-बिढी काही उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी? त्यामुळे आम्ही या भानगडीत पडत नाही. ज्याला पडायचं त्याला पडू दे”, असे त्यांनी म्हटले. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलतांना विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केले.
दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर काल (रविवार) एक ट्विट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यात वडेट्टीवार यांनी ‘गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.’ असे म्हटले होते.