नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ( Indian National Congress) दोन दिवसीय ८४ वे अधिवेशन गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे पार पडले. तब्बल ६४ वर्षांनी पुन्हा एकदा गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत आपली ताकद दाखवून दिली. यावेळी अधिवेशनातून काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी पुन्हा एकदा जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “देश आता मोदी सरकारला (Modi Government) कंटाळला आहे. भाजपाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक (Assembly elections in Maharashtra) कोणत्या पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत, पण निवडणूक आयोग अजूनही आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाही. येणाऱ्या काळात देशात बदल घडणार असून लोकांचे मत बदलत आहे. त्यामुळे तुम्ही बिहारच्या निवडणुकीत काय होतं ते बघा”, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “देशात दलित, अतिमागास, आदिवासी, अल्पसंख्य किती आहेत, त्यांचा विकास किती झाला आहे याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही जातनिहाय जनगणनेचा (Caste Wise Census) मुद्दा उचलला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने भूमिका मांडली की, आम्हाला जातनिहाय जनगणना करायची नाही किंवा आम्हाला याबाबत जाणून घ्यायचे नाही. मात्र, आम्ही तेलंगणामधून जातनिहाय जनगणनेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. तेलंगणामध्ये ९० टक्के आदिवासी असून, यात दलित, अल्पसंख्यांक आहेत. देशातील सहकार खात्यातून या समुदायाला काहीच मिळालेले नाही. मालकांच्या यादीत एकही दलित आदिवासी तुम्हाला बघायला मि्ळणार नाही. पंरतु, आम्हाला त्यांचा हक्क द्यायचा आहे, त्यामुळे आम्ही याची सुरुवात तेलंगणातून करत आहोत”, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही जनगणनेचा कायदा मंजूर करु
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने (RSS) सांगितले की, आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. आम्हाला याबाबत माहिती करुन घ्यायची नाही. देशातील गरीब, दलित आदिवासी अल्पसंख्यांच्या भागीदारीबाबत आम्हाला माहित करुन घ्यायचे नाही. भाजपला काय लपवायचे ते लपवू द्या, पण आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत कायदा मंजूर करुन घेणारच
असे राहुल गांधींनी सांगितले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा – खर्गे
या अधिवेशनात बोलतांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबात मोठा आरोप केला. ते म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता चार महिने पूर्ण झाले आहेत. यानंतरही या निवडणुकीवरुन वेगवेगळे दावे केले जात आहे. मी कुठेच ऐकले नाही किंवा बघितले नाही की, भाजप याठिकाणी १५० जागा लढवते आणि त्यापैकी १३८ जागांवर जिंकून येते. ९० टक्के रिझल्ट कसा? एवढा मोठा रिझल्ट या देशात कधी पाहिला आहे का? आम्ही देखील अनेक निवडणुका पाहिल्या असून मी सुद्धा १२ ते १३ निवडणुका लढलो आहे. मात्र, असे कधीच झाले नाही. महाराष्ट्रात ५५ लाख मतदार कसे वाढले? हा प्रश्न अनुत्तरीत असून जो घोटाळा महाराष्ट्रात झाला तो फक्त लोकशाहीला नष्ट आणि तंग करण्यासाठी केला”, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले.