अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगर शहरात पोलखोल सप्ताह उपक्रम राबवणार आहे. नगर शहरात मागील दहा वर्षांमध्ये कोणतेही ठोस असे विकास काम झालेले नाही. उलट, आहे त्यापेक्षा शहर मागे गेले असल्याने याचा आढावा या सप्ताहात मांडला जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. तसेच याचवेळी शहर विकासाचे व्हिजन देखील मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराचे विद्यमान आ. संग्राम जगताप यांच्या फ्लेक्स जाहिराती शहरभर लागल्या आहेत. यात विश्वास जुना…संकल्पना मांडली गेली आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसने जुन्या विश्वासाचा पोलखोल सप्ताह उपक्रम हाती घेतला आहे. 1 ते 7 ऑक्टोबर असा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने हा सप्ताह राबवला जाणार असल्याचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी सांगितले. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाणार असल्याचे शहर काँग्रेसने म्हटले आहे.सत्ताधार्यांकडून शहर विकासाचे अनेक दावे केले गेले.
2014 आणि त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत देखील अनेक खोटी स्वप्ने दाखविली गेली. जनतेने दिलेल्या संधीतून शहराचा विकास काही झालाच नाही. मात्र, स्वतःची पाठ बडवून घेणार्यांचा खासगी पातळीवर वैयक्तिक मोठा विकास झाला. सध्या शहरातील नागरिकांना दैनंदिन आयुष्य सुलभ पद्धतीने जगण्यासाठीच्या कोणत्याच व्यवस्था देता न येऊ शकल्यामुळे सर्वसामान्य नगरकरांमध्ये सत्ताधार्यांबाबत प्रचंड रोष आहे. त्यामुळे शहरात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, असा दावाही यानिमित्ताने काळे व गुंदेचा यांनी केला.