Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजभाजप आमदार गणपत गायकवाडांच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध; निवडणुक आयोगाला लिहिलं पत्र

भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध; निवडणुक आयोगाला लिहिलं पत्र

मुंबई | Mumbai
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपने सर्वाधिक पाच उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. मतदानासाठी भाजपचे तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाड हे तळोजा तुरुंगातून रवाना झाले आहेत, मात्र गायकवाडांना मतदान करायला देऊ नये, अशा शब्दात आक्षेप घेणारे पत्र काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिले आहे.

- Advertisement -

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्तामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र काँग्रेसच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आले आहे, ज्यामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

काय म्हंटले आहे पत्रात?
‘प्रति
मा. निवडणूक अधिकारी
विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2024
विधान भवन मुंबई

विषय – आ. श्री गणपत गायकवाड वि. स. स. यांना मतदानापासून रोखण्याबाबत

महोदय

विधानसभा सदस्य श्री गणपत गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. The representation of people act.1951 सेक्शन 62 (5) नुसार ते मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. विधान सभा सदस्य श्री. गणपत गायकवाड हे मतदान करणार असल्याचे समजते. कृपया त्यांना अवैध मतदान करण्यापासून रोखावे आणि The representation of people act.1951 सेक्शन 62 (5) नुसार कोणत्याही दबावात न येता संवैधानिक मुल्यांचे रक्षण करावे. अन्यथा आपण श्री गणपत गायकवाड यांना मतदान करू दिल्यास आम्हाला कायदेशीर बाबींचा अवलंब करावा लागेल.
धन्यवाद’

दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करु देऊ नका, अशी मागणी महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या या पत्राची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली असून यासाठी ते केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार घेणार असल्याची माहिती आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. न्याय व्यवस्थेवर आपण बोलू शकत नाही. गणपत गायकवाड यांनी स्वतः गोळी झाडली हे सगळ्यांनी पाहिलं. निवडणूक आयोग बायस आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.निवडणूक आयोग त्यांच्या घराचा गडी आहे, असं झाले हे तर. सत्तेचा वापर केला जात आहे. उघड्या डोळ्याने हे सगळे पाहत आहेत. निवडणूक अधिकाऱ्याला आम्ही आक्षेप नोंदवला असल्याचे दानवे यांनी सांगितले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या