Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजयुवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी केले पदमुक्त; कामात कसूर केल्याचा ठेवला ठपका

युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी केले पदमुक्त; कामात कसूर केल्याचा ठेवला ठपका

नागपूर | Nagpur
युवक काँग्रेसच्या बैठकीनंतर संघ मुख्यालयाला घेराव आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची स्थिती आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच राम मंदिर स्थापनेनंतर देशात स्वातंत्र्य अनुभवास आले, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशावरून नागपुरात संघ मुख्यालय परिसरात निदर्शने करण्याच्या युवक काँग्रेसच्या या महत्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आले आहे.

ज्या नेत्यांवर काँग्रेसने कारवाई केली, ते युवा शाखेचे सदस्य अथवा पदाधिकारी आहेत. काँग्रेसने काढून टाकलेल्यांमध्ये काही उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, २० सचिव आणि काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा आणि सहप्रभारी कुमार रोहित यांनी यासंदर्भातील पत्र काढले आहे. त्यानुसार यासंदर्भातील संघटनेने दिलेले काम जबाबदारीपूर्वक करण्यात अपयशी ठरल्याने पदमुक्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय युवा काँग्रेसने १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय प्रमुख उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता.

- Advertisement -

पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव यांचा समावेश आहे. तसेच नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष, सावनेर, कामठी, काटोल, हिंगणा, उमरेड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षांचा समावेश आहे. अशाप्रकारे अचानक पदमुक्त करण्यात आल्याने युवक काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पदमुक्त झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, सरिचटणीस शिवानी वडेट्टीवार, सरचिटणीस केतन ठाकरे, सचिव अक्षय हेटे यांचा समावेश आहे.

रविवारी संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी देवडिया भवन येथे बैठक बोलविण्यात आली होती. त्यात अनेक पदाधिकारी पोहोचलेच नव्हते. या आंदोलनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील वाद समोर आला. गेले पाच ते सहा दिवस संघाविरोधात आंदोलनाची तयारी सुरू होती. मात्र स्वतः कुणाल राऊत थायलंडला असल्यामुळे हे आंदोलन वारंवार पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे आंदोलन नेमके केव्हा आहे, या संदर्भात संभ्रम निर्माण झाले आणि अनेक पदाधिकारी कालच्या आंदोलनात पोहोचले नाही, असे स्पष्टीकरणही पदमुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.

या कारवाईनंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी कुणाल राऊत यांच्याविरोधातच बोलू लागले आहे. कुणाल राऊत गेले तीन वर्ष अध्यक्ष आहे आणि ते कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक वेळेला पदाधिकाऱ्यांवर मध्यरात्री कारवाई करतात आणि सकाळी अचानक जेव्हा त्यांना जाग येते, तेव्हा ते कारवाई मागे घेतात. गेले तीन वर्ष आम्ही अशीच मध्यरात्रीची कारवाई पाहत असल्याचे धक्कादायक आरोप ही काही पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच, आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे आहोत, यामुळेच आमच्यावर कारवाई झाली, असा आरोपही काहींनी केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या