Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपला सळो की पळो करून सोडणार - नाना पटोले यांचा इशारा

भाजपला सळो की पळो करून सोडणार – नाना पटोले यांचा इशारा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आणि चुकीचे आहेत. या आरोपांमागे भाजपचा हात आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली आणि नंतर त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आम्ही मौन सत्याग्रह आंदोलन केले. आज एक दिवसाचे मौन सत्याग्रह संपले असून आता भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून त्यांना सळो की पळो करुन सोडू, असा असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे दिला.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज मंत्रालय जवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन सत्याग्रह करण्यात आला. या मौन सत्याग्रह आंदोलनात नाना पटोले सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीका केले. मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला नामोहरम करुन सोडले होते. आज त्याच अस्त्राचा वापर काँग्रेसने भाजप सरकारच्याविरोधात केला आहे. भाजपच्या भ्रष्ट, अत्याचारी, हुकूमशाही सरकारविरोधात हा लढा सुरु आहे. हा लढा मुंबईसह महाराष्ट्रभर आणखी तीव्र करुन भाजपचा भांडाफोड करु, असे पटोले म्हणाले.

राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न संसदेत मांडत असताना अदानी-मोदी संबंध काय आहेत असा सवाल विचारल्यानंतर मोदी सरकार घाबरले आणि आपले पितळ उघडे पडणार या भितीतून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटी कारवाई केली. देशातील जनता हे सर्व पहात असून राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपविरोधात वणवा पेटला आहे आणि या वणव्यात भाजपचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला.

तर काँग्रेसची लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. मौनात मोठी ताकद आहे. महात्मा गांधी यांनी दिलेले अहिंसेचे हे मोठे अस्त्र आहे. सत्य, सद्भावना आणि अहिंसा यावर आम्ही बोलत आहोत. तर भाजप मात्र सत्तेसाठी काहीही करत आहे. लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. पण भाजप ईडी, सीबीआयचा गैरवापर करून सत्तेसाठी काहीही करत आहेत. काँग्रेस सत्यासाठी तर भाजपा सत्तेसाठी लढत आहे. लोकशाही आणि संवैधानिक मूल्ये टिकवण्यासाठी आमचा संघर्ष सुरु आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन हा लढा देत आहोत, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या मौन सत्याग्रह आंदोलनात सहभागी नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या मुखपट्ट्या बांधून भाजपचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनात सहभागी होऊन राहुल गांधी यांना पाठिंबा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या