नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या रविवारी(दि. 6) नाशिक दौर्यावर येणार आहेत. सपकाळ यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहर काँग्रेस जयंती उत्सव समितीच्या वतीने साकारण्यात येणार्या विश्वविक्रमी देखाव्याच्या मंडपाचे भूमिपूजन काँग्रेस भवन येथे होणार आहे. त्यानंतर काँग्रेस भवन येथील सभागृहात काँग्रेस पदाधिकारी बैठक व रामनवमी, होळी व ईदनिमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रम नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केला आहे.
यानंतर सपकाळ हे रामनवमीनिमित्त शहरातील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असून यानंतर रमाबाई आंबेडकर वसतिगृहात एनएसयूआयच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. दौर्या दरम्यान ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स्वर्गीय तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. तसेच नामको चॅरिटेबल हॉस्पिटल या संस्थेसही भेट देणार असल्याची माहिती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी दिली.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील, खासदार डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा प्रभारी ब्रिज किशोर दत्त, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे, गटनेते शाहू खैरे आदी उपस्थित राहणार आहेत.