राहुरी (प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. राहुरीसाठी पक्षाकडे ४ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या गुरूवारी मुलाखती घेण्यात आल्या. अंतिम उमेदवारांची निवड पक्ष नेतृत्वाच्या चर्चेनंतर निश्चित होणार आहे. आता काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार की, ऐनवेळी घुमजाव करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, स्थानिक पातळीवरील समीकरणांचा आढावा घेण्यात आला. इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्ष नेतृत्व योग्य उमेदवार निवडण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे बारामती आणि राहुरीतील राजकीय लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, महाविकास आघाडीत जागावाटप आणि रणनीतीबाबतही पुढील घडामोडींना वेग येणार आहे.
आमच्या पक्ष श्रेष्ठींसोबत बोलणं झालं-सपकाळ
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील याबाबत काल माध्यमांशी बोलताना सांगितलं की, राहुरी आणि बारामती विधानसभेबाबत आमच्या श्रेष्ठींसोबत बोलणं झालं आहे. यासाठी आमच्याकडे उमेदवारी मागणारे अर्ज आले आहेत.
बारामतीसाठी ६ अर्ज आले आहेत आणि राहुरीमधे ४ अर्ज आले आहेत. येत्या २ दिवसांत आम्ही निवडणूक लढण्याबाबत भूमिका जाहीर करू. काल ऑनलाईन मुलाखती देखील झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी काल दिली होती. दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीसाठी सुरेश लांबे, बाळासाहेब आढाव, विजय मकासरे आणि अॅड. अथर्व साहेबराव म्हसे हे चारजण इच्छुक असून या इच्छुकांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राही या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहूरी आणि बारामतीसाठी २३ एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहूरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.





