महापालिका निवडणुकीत काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे पानिपत झाले असले तरी त्याचे कोणालाच आश्चर्य वाटले नाही. किंबहुना पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले याचे अप्रूप मात्र जरूर वाटले. सुरुवातीच्या काळात महापालिकेत सत्ता सांभाळणार्या या पक्षाची घसरण थेट तीन जागांपर्यंत व्हावी, यावरून हा पक्ष त्यांच्याच नेत्यांनी कसा हद्दपार करून ठेवलाय याची प्रचीती येते. काँग्रेसला घरघर लागूनही बराच काळ लोटला. नेते दिल्ली-मुंबईत, कार्यकर्ते घरात, संघटनाचा पत्ता नाही, अशी स्थिती येऊनही जमाना उलटला. तरीही ना स्थानिक नेत्यांना कधी फरक पडला ना मुंबईतील वरिष्ठांना.
आकाश छाजेड नावाचे शहराध्यक्ष गेली अनेक वर्षे प्रभारी आहेत. त्यांना किमान नियमित अध्यक्ष तरी करावे, असेही कोणाला वाटत नाही. दस्तुरखुद्द छाजेड यांनाही ‘सांगे वडिलांची कीर्ती’ यापलिकडे कधी काही सुचले नाही. साहजिकच पक्षाचे कागदी अस्तित्त्व ठेवले हेच काय त्यांचे कर्तृत्व. पालिका निवडणुकीत सुरुवातीला स्वबळाचा नारा देणार्या या पक्षाला अनेक प्रभागात उमेदवारही देता आलेले नाहीत. जे तिघे निवडून आले ते देखील त्यांचे नाहीत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले सुफी जीन यांनी चारही उमेदवार माझेच या अटीशर्तीवर काँग्रेसची उमेदवारी घेतली. राष्ट्रवादीने त्यांना नाकारल्याने त्यांनाही पक्षाची गरज होतीच; पण त्यांच्या हिंमतीवर त्यांनी तीन जण निवडून आणल्याने त्यात काँग्रेसचा पक्ष म्हणून वाटा किती हा संशोधनाचा विषय ठरावा.
सुफी जीन हे सलग दोनदा राष्ट्रवादीकडून विजयी झालेले होते. असे असले तरी जीन व दुबई प्रभागातील उमेदवार ठरविणार्या राष्ट्रवादीतील बाह्यशक्ती यांच्यात मधुर संबंध नसल्याने यंदा त्यांना पक्षाने ठेंगा दाखविला होता. जीन यांच्या धनशक्तीपुढे सगळेच हतबल झाले आणि त्यांनी नाझिया अत्तार व समिआ खान यांनाही विजयी केले. राष्ट्रवादीच्या जागृती गांगुर्डे उर्फ अमायरा बब्बू शेख यांनी मात्र कमाल करीत विजय मिळविला. जागृती गांगुर्डे या कुप्रसिद्ध अर्जुन पगारे यांची बहीण तर समिआ खान या दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर याची नातेवाईक, असा हा दुबई वॉर्ड त्यामुळेच चर्चेत राहिला. तरीही त्यांचा विजय झाला हा भाग अलाहिदा. काँग्रेसचा वरिष्ठ स्तरावरील एकही नेता प्रचारासाठी नाशिकमध्ये फिरकला नाही. यापूर्वी फुटकळ कामांसाठीही नाशिकचे उंबरे झिजविणारे बाळासाहेब थोरात यांनीही यंदा नाशिक सायडिंगला टाकले. त्यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी यापूर्वीच आशा तडवी यांच्यासह शिवसेनेला जवळ केले होतेच.
ऐन निवडणूक भरात असताना शाहू खैरे या जुन्या जाणत्या नेत्यानेही पंजाची साथ सोडून हाती कमळ घेतले. तत्पूर्वी जॉय कांबळे, हेमलता पाटील यांनी काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून हात टेकले होतेच. गुरुमित सिंग बग्गा व नरेश पाटील यांनीही काँग्रेसच्या बुडत्या नावेतून उतरून भाजपच्या कमळाचा आधार घेतला. केवळ वत्सला खैरे व लक्ष्मण जायभावे हेच माजी नगरसेवक पक्षात राहिले होते. एवढे लोक सोडून गेले तरी पक्षाला ना फिकीर ना काळजी. वत्सलाताई व लक्ष्मणराव एकेकटेच किल्ला लढवित असताना त्यांच्या मदतीलाही कोणाला जावेसे वाटले नाही, ही काँग्रेस नेत्यांची तर्हा. हनीफ बशीर शेख, सुरेश मारू व ज्ञानेश्वर काळे यांनी उमेदवारी न मिळाल्याच्या निषेधार्थ पक्ष कार्यालयाला कुलूप लावल्याची घटना व्हायरल झाली तेव्हा त्याचे वाईट वाटण्यापेक्षा पक्षात अजूनही असे लोक आहेत, याचीच अधिक चर्चा झाली. हनीफ शेख यांनी तर खासदार बच्छाव यांच्यावर तिकिटे विकल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. बशीरसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून सुफी जीन यांना उमेदवारी दिली गेली. नंतर त्यातील काहींची हकालपट्टी केली गेली.
आधीच पक्षात माणसं कमी. त्यातच ही वजाबाकी. अर्थात, जीन यांनी किमान तीन जणांना विजयी तरी केले; अन्यथा काँग्रेसला भोपळा तरी फोडता आला असता का असा प्रश्न पडू शकतो. शहराध्यक्ष आकाश छाजेड कदाचित या तिघांच्या विजयाच्या जोरावर आणखी काही वर्षे प्रभारी का होईना पण अध्यक्ष राहू शकतील. खासदार शोभा बच्छाव यांनी शहराध्यक्षपद व महापौरपदही भूषविलेले असल्याने त्यांनी निवडणूक काळात संपूर्ण शहर पिंजून काढणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्यासह शहराध्यक्षांनीही उमेदवारांना वार्यावर सोडले.
अवघ्या तेवीस जागा लढवित असतानाही या मंडळींना प्रचार करावासा वाटू नये, यावरून पक्षाची हालत किती खस्ता झाली आहे हे कळते. खरे तर उर्वरित पालिकांपैकी काही ठिकाणी काँग्रेसची कामगिरी बरी दिसत असताना नाशिककडे जर योग्य लक्ष दिले गेले असते तर कदाचित आणखी काही जागा निश्चितच वाढल्या असत्या. राज्यभर एमआयएमने मुसंडी मारली असताना नाशिकच्या मुस्लीम समाजाने त्यांना रोखले याची कारणे जाणून काम केले तर काँग्रेस पूर्वीच्या काही भागात पुन्हा रुजू शकते, हे दिसते. पण काँग्रेसला हे कळून नेते भानावर येतील का ?




