Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखजागरूक लोकसहभाग मोलाचा

जागरूक लोकसहभाग मोलाचा

भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे आणि जगप्रसिद्ध लोणार सरोवराला प्लास्टिक कचऱ्याचा धोका निर्माण झाला आहे. सरोवराच्या परिसरात प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत. त्याचेच कण सरोवराच्या पाण्यात मिसळत आहेत. यावर उपाय शोधले गेले नाहीत तर सरोवरातील जिवाणू आणि विषाणू नष्ट होतील अशी भीती व्यक्त होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जीवशास्त्राच्या अभ्यासकांनी लोणार सरोवराच्या पाण्यावर होत असलेल्या प्लास्टिक कणांच्या परिणामावर संशोधन केले. त्यावर आधारलेला शोधनिबंध ‘एन्व्हॉयर्मेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात वरील निष्कर्ष नमूद आहेत. प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा अधिकाधीक घट्ट होत आहे. प्लास्टिकचा वाढता आणि बेशिस्त वापर ही समस्या अधिक गंभीर बनवत आहे. एक सामाजिक रूढीपालन लोणार सरोवराबरोबर नद्यांभोवतीही फास टाकत आहे. तीर्थक्षेत्री सरोवर, तलाव किंवा नदीत स्नान करून ओले कपडे पात्रात किंवा काठावर टाकून जातात. बरोबरीने प्लास्टिकचा कचराही सोडून देतात. लोणार सरोवरही त्याला अपवाद नाही. प्लास्टिकचा वापर थांबवणे हा उपाय होऊ शकत नाही. परिणामी विविध देशांमध्ये यावर संशोधन सुरु आहे. संस्थात्मक आणि व्यक्तिगत पातळीवर देखील उपाय शोधले जात आहेत. इंडोनेशियामधील या क्षेत्रात काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने ३५ हजार प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करून छोटेसे घर बनवले आहे. तो त्या घरातच राहातो. औरंगाबादमधील दोन तरुणींनी रस्त्यावर फेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कचरा वापरून झोपड्या बनवल्या. नैसर्गिकरित्या प्रदूषित प्लास्टिक खाणारे विषाणू शोधून काढण्याचा प्रयत्न युरोपियन संशोधक शास्त्रज्ञ करत आहेत. तामिळनाडूच्या मदुराई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लस्टिकचा वापर करून रस्ते बनवले आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी यासाठी संशोधन केले. प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून इंधन बनवणाऱ्या संयंत्रांची उभारणी नाशिक महानगपालिकेने केली. महानगपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरु झाला. असे विविध उपाय योजले जात आहेत. लोकही यात मोलाचा सहभाग देऊ शकतील. लोकांनी बेपर्वा वृत्तीने इतस्ततः फेकलेले प्लास्टिक जीवसृष्टीभोवती फास आवळत आहे. पृथ्वीतलावर माणूस जिथेजिथे पोहोचला तिथेतिथे प्लास्टिकचा कचरा पोहचला असे म्हटल्यास वावगे ठरेल का? ठिकठिकाणी प्लास्टिकचे ढीग आणि डोंगर उभे राहात आहेत. पशूंच्या, समुद्री जीवांच्या पोटातही प्लास्टिक सापडते. त्यांच्या जीवावर उठते. अशा घटना घडतात. एकदा वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे. तथापि सामाजिक पातळीवरील सहकार्याने बंदी प्रभावशाली ठरलेली नाही. लोक प्लास्टिकचा वापर मर्यादित करू शकतील. एकदा वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवू शकतील. वापरलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण करून घंटागाडीत टाकू शकतील. शक्य असेल तेव्हा पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करण्याचे टाळू शकतील. जगातील पातळीवर उपाय शोधले आणि योजले जातील. सक्रिय आणि जागरूक लोकसहभाग प्रदूषणाची तीव्रता कमी करू शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या