Saturday, July 27, 2024
Homeनाशिकटोमॅटो आयातीच्या निर्णयाने ग्राहक खूश; शेतकरी हिरमुसले!

टोमॅटो आयातीच्या निर्णयाने ग्राहक खूश; शेतकरी हिरमुसले!

नाशिक । विजय गिते Nashik

वीस किलोच्या क्रेट्सला 2300 ते 2500 रुपये इतका बाजारभाव मिळत होता. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर किलोला दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले होते. यामुळे काही मोजक्याच शेतकर्‍यांना जास्तीचे दोन पैसे मिळू लागले. मात्र, केवळ शहरी ग्राहक डोळ्यासमोर ठेवणार्‍या केंद्र सरकारने याही वेळी ग्राहक हित समोर ठेवत व त्यास दिलासा देण्यासाठी थेट नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला अन् जे व्हायचे तेच झाले. 2500 रुपये विकणारा टोमॅटो निम्यावर म्हणजेच अकराशे रुपयांवर आले. टोमॅटोचे दर निम्म्याने घसरल्याने ग्राहक खुश शेतकरी हिरमुसले! अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे.

- Advertisement -

पंजाब, कर्नाटक राज्यासह नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. दैनंदिन वीस ते पंचवीस हजार टोमॅटो क्रेट्सची आवक होता आहे. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे टोमॅटोच्या बाजारभावात पन्नास टक्क्यांनी घसरण झाली आहे.गेल्या महिन्याभरापासून टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना सरासरी दोन हजार रुपये प्रति क्रेट्स असा स्वप्नवत भाव मिळत होता. टोमॅटोचे दर सर्वकालीन उंचीवर पोहोचल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या उलट चित्र ग्राहकांमध्ये होते.

परराज्यांत किरकोळ बाजारात ग्राहकांना दोनशे ते अडीचशे रुपये किलोने खरेदी करावा लागत होता. मात्र, दरवाढीवरून ग्राहकांची ओरड होऊ लागल्याने टोमॅटोची नेपाळमधून आयात करण्याचे धोरण केंद्र सरकारकडून जाहीर होताच त्याचे पडसाद बाजारभावावर उमटले. यामुळे उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कधी नव्हे ते टोमॅटोमुळे शेतकर्‍यांना चार पैशांची कमाई व्हायला लागली होती. नाही म्हणायला, ग्राहकांची परवड झाली, पण शेतकर्‍यांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले. सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

केंद्र सरकारने आयातीचे धोरण स्वीकारल्याने व बंगळुरूच्या बाजारपेठेत वाढलेल्या आवकेमुळे टोमॅटोच्या दरात घसरण झाली. दोन हजार रुपयांचा दर एकाच दिवसात निम्म्यावर येत तो हजार अकराशे रुपये प्रति क्रेट्सपर्यंत कोसळला.

निर्यातीसाठी पुढाकार घ्या

वांग्याला मातीमोल भाव मिळाल्याने वांग्याचे पीक काढले. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्याने वांग्यात झालेले नुकसान टोमॅटोतून भरून काढता येईल, यासाठी टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोला बाजारभाव मिळू लागताच केंद्र सरकारने नेपाळचा टोमॅटो आयातीचा निर्णय घेतल्याने वांग्यासारखीच परिस्थिती टोमॅटोची होऊ नये, यासाठी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून टोमॅटोची निर्यात करावी. गेल्या चार ते पाच वर्षानंतर टोमॅटोच्या बाजारभावाची तेजी निर्माण झाल्याने कुठे तरी टोमॅटो उत्पादकांना अच्छे दिन आले. असे असताना टोमॅटो आयात करण्याच्या घाईगडबडीच्या निर्णयामुळे टोमॅटो मातीमोल बाजारभावने विकण्याची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. ही वेळ टोमॅटो उत्पादकांवर येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत टोमॅटो खरेदी करत ग्राहकाला फुकट वाटावे. तसेच जास्तीत जास्त टोमॅटो देशाबाहेर निर्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून जोर धरु लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या