Thursday, November 21, 2024
Homeअग्रलेखतुझे आहे तुजपाशी ; परी तू जागा चुकलाशी

तुझे आहे तुजपाशी ; परी तू जागा चुकलाशी

भारतीय आहारात अल्ट्रा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. २०२० पासून चरबी, साखर आणि मिठाचा अतिरिक्त वापर केलेल्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. २०३२ पर्यंत हा खप वेगाने वाढेल. विशेष म्हणजे भारतीयांच्या आहार पद्धतीत करोना पश्चात हा बदल झाला आहे. इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी या विषयावर संयुक्त सर्वेक्षण केले. त्यात ही माहिती नमूद आहे. करोनाने बहुसंख्य देशांच्या समाजव्यवस्थेला हादरे दिले. वैयक्तिक व सामाजिक आरोग्याची, स्वच्छतेची निकड जाणवून दिली. प्रतिकारक्षमतेची अनिर्वार्यता पटवून दिली.

ती बळकट होण्यासाठी लोकांना पौष्टिक आहाराचे महत्वही लक्षात आणून दिले. अर्थात त्यासाठी प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागली. त्यामुळे त्यातून माणसे कायमची शहाणी होतील अशी जाणत्यांची अपेक्षा होती. तथापि ती फोल ठरत असल्याचे उपरोक्त अहवाल दर्शवत असावा का? शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहार महत्वाची भूमिका बजावतो हे लोकांना वेगळे सांगायला हवे का? भारताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली. अनेक कुटुंबांचे आयर्वेदिक डॉक्टर कौटुंबिक डॉक्टर असतात. आयुर्वेद योग्य आहाराची अनेक मार्गदर्शक तत्वे सांगतो. मधूर, आंबट, तिखट, कडू, खारट आणि तुरट या चवींनी युक्त आहार असावा असे हे शास्त्र सांगते. शरीर आणि बुद्धीचा विकास त्यावर अवलंबून असतो हे नव्याने सांगण्याची गरज आहे का? डॉक्टरही त्यावरच भर देत नाहीत का? जिभेला जे आवडते ते आरोग्यासाठी फारसे लाभदायक नसते आणि जे जिभेला आवडत नाही ते मात्र आरोग्यासाठी चांगले असते असे अनेक तज्ज्ञ म्हणतात.

- Advertisement -

तरीही माणसाच्या आरोग्यच्या सवयी बिघडत आहेत. वाढत्या अनारोग्याचे ते देखील एक प्रमुख कारण आहे. भारत लवकरच मधुमेह आणि हृदयविकाराची राजधानी बनले असे अनेक अहवालांचे निष्कर्ष आहेत. तसा अनुभव समाज घेतो. तरुण पिढीकडे कुटुंबाचा आधार म्हणूनआशेने पाहिले जाते.

पण तरुण वयात दुर्धर व्याधी जडण्याचे प्रमाण वाढत आहे. हृदयविकाराने आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीमुळे होणारे तरुणांचे मृत्यू माणसांना अस्वस्थ करतात. ते त्यांचे मरणाचे वय नाही अशी सार्वत्रिक भावना त्या त्या वेळी व्यक्त होते. तथापि त्याची काही कारणे अयोग्य आहारात दडलेली आहेत याची जाणीव का होत नसावी? आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे अशा अर्थाचा श्लोक लहान वयातच शिकवला जातो. वैद्यकीय उपचार महागडे होत आहेत. पैसे असूनही आरोग्य विकत घेता आणि अकाली मृत्यू टाळता येत नाही हा मूल्यवान धडा करोनाने सर्वानाच घालून दिला. त्याचा विसर भारतीयांना फार लवकर पडला असेच उपरोक्त अहवाल सुचवतो. ‘तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी’ अशी ही गत म्हणावी का? मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. माणसे मृत्यूला घाबरतात असे आढळते. अकाली मृत्यूच्या जाणिवेने तरी माणसे त्यांची आहारपद्धती योग्य करू शकतील का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या