घारगाव |वार्ताहर| Ghargaon
रस्त्यावर बेजबाबदारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घालणार्या वाहनचालकांसाठी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने एक कडक व संदेश देणारा निकाल दिला आहे. 2-3 वर्षांपूर्वी घडलेल्या एका भीषण अपघात प्रकरणात वारकर्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसवणार्या आरोपी चालकाला 3 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
3 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (क्र. 60) खंदरमाळवाडी शिवारातून वारकर्यांची दिंडी शिस्तबद्धपणे चालली होती. यावेळी आरोपी चालक छोटेलाल आलगु पाल याने अत्यंत बेजबाबदारपणे व भरधाव वेगात आपला कंटेनर दिंडीत घुसवला. या अपघातात 4 वारकरी चिरडले गेले, तर पालखी रथावर कंटेनर आदळल्याने 15 ते 16 वारकरी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला स्थानिकांनी पकडून घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
घारगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष बी. खेडकर यांनी या प्रकरणाचा अत्यंत चिकाटीने तपास करून न्यायालयात मजबूत दोषारोपपत्र दाखल केले होते. संगमनेर येथील जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश (क्र. 2) एम. आर. नेरलेकर यांनी प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार व पोलिसांच्या परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेत आरोपीला भारतीय दंड संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम 304 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत 3 वर्षे सश्रम कारावास, कलम 279 (धोकादायक ड्रायव्हिंग) अंतर्गत 4 महिने, कलम 337 व 338 (गंभीर दुखापत) अंतर्गत अनुक्रमे 5 महिने व 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 व 134/187 (अपघातानंतर पळून जाणे) अन्वये प्रत्येकी 2 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महामार्गावरून किंवा गर्दीच्या ठिकाणाहून जात असताना वेगावर नियंत्रण नसणे आणि नियमांचे उल्लंघन करणे हे केवळ अपघातालाच आमंत्रण देत नाही, तर चालकाला थेट तुरुंगात ढकलून देऊ शकते, असा स्पष्ट संदेश या निकालातून न्यायालयाने दिला आहे.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ. रेश्मा जाधव यांनी सरकारी पक्षातर्फे मजबूत बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी (सहा. फौजदार प्रवीण डावरे व सुरेश टकले) यांनी खटल्याचा सतत पाठपुरावा केला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन व पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.




