अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील एका शासकीय कंत्राटदाराची तब्बल 14 लाख 87 हजार 624 रूपयांची जीएसटी मध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रोहन श्रीकांत मांडे (वय 42 रा. साई कॉलनी, फुलारी मळा, सावेडी) असे फसवणूक झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. आदित्य इंटरप्रायजेस या संस्थेने सिमेंट पुरवठा करताना खोटे इनव्हॉइस देऊन शासनाच्या जीएसटीची मोठी रक्कम बुडवली असल्याची फिर्याद मांडे यांनी शनिवारी (21 जून) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिली.
याप्रकरणी नीलेश आकरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रोहन मांडे हे गेल्या 15 वर्षांपासून में. रोहन एस. मांडे इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स या नावाने बांधकाम व रस्ते विकासाच्या शासकीय ठेकेदारीचा व्यवसाय करत आहेत. आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले सिमेंट त्यांनी मार्च 2024 मध्ये नीलेश आकरे याच्या में. आदित्य इंटरप्रायजेस या संस्थेकडून खरेदी केले होते. या खरेदीसाठी नीलेश आकरे याने जीएसटीसह रीतसर टॅक्स इनव्हॉइस दिला होता. त्यानुसार मांडे यांनी 68 लाख रूपयांची रक्कम आरटीजीएसव्दारे आकरे याच्या खात्यावर वर्ग केली. मात्र, नंतर वित्त मंत्रालयाच्या सीजीएसटी विभागाकडून आलेल्या नोटीसमधून मोठा प्रकार उघडकीस आला.
या नोटिशीत में. आदित्य इंटरप्रायजेस यांचा जीएसटी क्रमांक बंद असल्याचे सांगण्यात आले असून त्यांनी ग्राहकांकडून घेतलेली 14 लाख 87 हजार 624 रूपयांची जीएसटीची रक्कम शासनाकडे भरलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी, ही संपूर्ण रक्कम भरून दंडासह जबाबदारी मांडे यांच्यावर टाकण्यात आली आहे.
जीएसटी भरल्याचे भासवले
फिर्यादीत रोहन मांडे यांनी नमूद केले आहे की, नीलेश आकरे याने खोटे इनव्हॉइस देऊन जीएसटी भरल्याचे भासवले आणि विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली आहे. शासनाची व त्यांची एकूण 14 लाख 87 हजार 624 रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.




