कचरा व्यवस्थापन हा दीर्घकालीन चिंतेचा विषय आहे. ते तसे होत नसल्यामुळे कचर्यामुळे विशेषत: प्लास्टिकच्या कचर्यामुळे प्रदूषण जीवसृष्टीवर कदाचित घाला घालेल अशी भीती संशोधक आणि अभ्यासकांना वाटत आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये संशोधन सुरु आहे.
जगातील महासागरांमध्ये 171 ट्रिलियनपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा साठला आहे. त्याचे वजन सुमारे 2.3 अब्ज टन इतके आहे. आठ ते दहा दशलक्ष टन प्लास्टिकचा कचरा दरवर्षी समुद्रात टाकला जातो. यामुळे अनेक सागरी जीव त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. प्लास्टिक कचर्यामुळे नद्यांचे नाले बनत आहेत. डोंगरांवर झाडांऐवजी प्लास्टिकच साठत आहे. थोडासा जरी पाऊस पडला तरी शहरांची तुंबई होत आहे.
व्यवस्थापन न करता इतस्तत: कचरा फेकायची सवय याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. उद्योग, व्यवसाय, रुग्णालये अशा विविध ठिकाणी निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट कशी लावायची याविषयी सरकारी धोरण असते. त्याची अंमलबजावणी हा चर्चेचा विषय असू शकतो. तथापि सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर केले जाणारे प्रयत्न देखील प्लास्टिक कचरा प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकतात. समाजमाध्यमांवर नुकतीच एक पोस्ट व्हायरल झाली. घराघरात विविध प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा तयार होतो. सामान्यत: तो कचर्याच्या डब्यात फेकला जातो. तसे न करता सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत भरुन बाटलीचे झाकण पक्के लावून ती कचर्याच्या डब्यात टाकावी असे आवाहन या पोस्टमध्ये केले आहे. प्लास्टिक कधीही नष्ट होत नाही पण त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो.
त्यापासून ऊर्जा तयार केली जाऊ शकते. तथापि त्यासाठी प्लास्टिक कचर्याचे व्यवस्थापन करावे लागते. अन्यथा त्याचा पुनर्वापर करणे शक्य होतेच असे नाही असे तज्ञ सांगतात आणि इथेच ग्यानबाची मेख दडलेली आहे. कचरा वाट्टेल तसा आणि वाटेल तिथे फेकण्याची सवय ही त्यातील मोठी अडचण आहे. अनेक व्यक्ती, व्यक्तीसमूह आणि सामाजिक संस्था कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन या क्षेत्रात स्वयंस्फुर्तीने कार्यरत आहेत. फेकून द्याव्या लागणार्या प्लास्टिकच्या पिशव्या स्वच्छ धुवून वाळवाव्यात. एका प्लास्टिकच्या बाटलीत भरुन बाटली बंद करावी आणि मगच ती बाटली कचर्याच्या डब्यात फेकावी. यामुळे पुनर्वापर सोपा होतो. या बाटल्यांचा ‘इको ब्रिक्स’ म्हणून वापर होऊ शकतो असे या क्षेत्रातील कार्यकर्ते आणि तज्ञ सांगतात.
सामान्य माणसांची एक छोटीशी कृती किंवा सवयीतील छोटासा बदल जीवसृष्टीवरचा प्लास्टिक प्रदूषणाचा भार कमी करु शकतो. दैनंदिन जगण्यातील प्लास्टिकचा वापर थांबवणे कठीण किंबहुना अशक्य वाटू शकते. तथापि त्याचा योग्य वापर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्यापासून थांबवू शकतो. समुद्री जीव वाचवू शकतो. नद्यांचे नाले होणे थांबवू शकतो. नद्या प्रवाही राहिल्या तर पुर येण्याची शक्यता ऊणावते. शहरे स्वच्छ आणि सुंदर बनवू शकतो. चुकीच्या सवयींमुळे कचर्याचे ढीग निर्माण करणे, तो कचरा कोणीतरी आवरणे आणि तोच कचरा माणूस आणि जीवसृष्टीच्या जीवावर उठणे यात कोणते शहाणपण? वैयक्तिक पातळीवर कचरा व्यवस्थापनाचे सामाजिक भान प्रत्येकाने दाखवण्याची वेळ आली आहे.