अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्यात हत्ती दरवाजा येथील दर्ग्याजवळ देश विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी करणार्यांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. टैप्या उर्फ जैद सैय्यद (रा. मुकुंदनगर) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीची मुदत 23 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
देश विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. किल्ल्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनी व भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले होते. तसेच टैप्या उर्फ जैद सैय्यद याने आरोपींना घोषणाबाजी करण्यास सांगितल्याचे तपासात समोर आल्याने त्यालाही या प्रकरणी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने सुरूवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, त्याची तपासणी करायची आहे, त्याच्यासमवेत आणखी काही साथीदार आहे का, याचा तपास करायचा आहे, त्यामुळे पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी तपासी अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने सैय्यद याच्या कोठडीत 23 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.