Saturday, July 27, 2024
Homeनगरसाईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या धीरेंद्र शास्त्रींची अखेर माफी

साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या धीरेंद्र शास्त्रींची अखेर माफी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर साईबाबा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. बागेश्वर धामकडून याबाबत अधिकृत माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. या माफीनाम्यात त्यांनी आपल्या वक्तव्यामुळे इतरांच्या मनाला त्रास झाला त्याबद्दल दु:ख होत असून खेद वाटत असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

बागेश्वर बाबा यांनी माफी मागण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यावेळीही वारकरी संप्रदाय संतप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी साईबाबा यांच्याविषयी केलेल्या विधानाचे पडसाद देशभरात उमटले. देशभरात त्यांच्याविरोधात टीका करण्यात आली. विशेष म्हणजे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर अखेर बाबांना माफी मागावी लागली.

संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. मी एक म्हण बोलली की आपल्या मागे छत्री ठेवून आपण शंकराचार्य आहोत असे म्हटले तर कसे होईल? आमच्या शंकराचार्यांनी जे म्हटलं त्याच गोष्टींचा आम्ही पुनरुच्चार केला की साईबाबा संत, फकीर असू शकतात.

त्यांच्याप्रती लोकांची आस्था आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. कुणी संत किंवा गुरुंना देव मानत असेल तर ती त्याची वैयक्तिक आस्था आणि भावना आहे. आमचा त्याला अजिबात विरोध नाही. आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं हृदय दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत आहे, अशा शब्दांत बागेश्वर बाबा यांनी माफी मागितली आहे.

बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांचा माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात. साईबाबा देव आहेत की नाही यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धिरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे. त्यांची अक्कल ठिकाणावर येईल, अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या होत्या.

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले होते ?

जबलपूर येथे बागेश्वर बाबांच्या श्रीमद्भगवत कथेचा शेवटचा दिवस होता. यावेळी ते लोकांशी संवाद साधत होते. भक्तांच्या प्रश्नांना उत्तरही देत होते. यावेळी त्यांना साईबाबांविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी आपलं म्हणणं खरं असल्याचं सांगण्यासाठी शंकराचार्यांचा दाखलाही दिला. आपल्या शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलं नाही. शंकराचार्यांचं म्हणणं ऐकणं हे बंधनकारक आहे. प्रत्येक सनातनी धर्माने शंकराचार्यांचं ऐकलं पाहिजे. कारम शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणताही संत असेल, मग तो आपल्या धर्माचा का असेना, तो देव होऊ शकत नाही, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

कोणताही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युग पुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणही देव नाही. आम्ही कुणाच्याच भावनेला ठेस पोचवत नाहीये. पण साईबाबा संत होऊ शकतात. फकीर होऊ शकतात. ते देव होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही लोक माझं मत हे वादग्रस्त ठरवतील. पण सत्य बोलण्याची गरज आहे. कारण गिधाडांचं चामडं पांघरून कोणीही सिंह होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. बागेश्वर बाबांनी हे विधान करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या