Monday, October 7, 2024
Homeनगरसहकारच्या निवडणुकांना पुन्हा आचारसंहितेचा ‘अडसर’

सहकारच्या निवडणुकांना पुन्हा आचारसंहितेचा ‘अडसर’

नगर जिल्ह्यातील 450 ते 500 संस्थांचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मागील आठवड्यात दिले होते. त्यानुसार राज्यातील 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, येत्या आठ ते दहा दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता असल्याने नगरच्या सहकार विभागाने जिल्ह्यातील 450 ते 500 सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर पुढे ढकलल्या आहेत, त्या टप्प्यानुसार 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. अ आणि ब वर्गांतील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने मागील आठवड्यात दिले होते.तसेच क आणि ड वर्गातील ज्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम मतदार यादी प्रसिद्धीनंतर पुढे ढकललेला आहे, अशा संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकार्‍यांची मान्यता घेण्यात यावी.

मात्र, हे करत असतांना ज्या सहकारी संस्थांची मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम ज्या टप्प्यावर पुढे ढकललेला आहे, त्या टप्प्यापासून पुढे सुधारित यादी कार्यक्रम राबवावा. ज्या संस्थांना जिल्हा, तालुका, प्रभाग निवडणूक अधिकार्‍यांनी मागणी केल्याप्रमाणे प्राधिकरणाने अर्हता दिनांक दिला आहे, अशा संस्थांच्या मतदारयाद्या त्या अर्हता दिनांकावर तयार करून निवडणूक प्रक्रिया राबवावी, राज्य निवडणूक सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले होते.
नगर जिल्ह्यात सध्या 450 ते 500 सहकारी संस्थांची निवडणूक होणे बाकी आहे. यातील क आणि ड वर्गातील निवडणूका गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रखडलेल्या आहेत.

प्रारूप मतदार यादी कार्यक्रमापर्यंत प्रक्रिया झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीमुळे जानेवारी, फेबु्रवारीपासून या निवडणुका जागेवर थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, मागील आठवड्यात सहकार निवडणूक प्राधिकारणाकडून निवडणुकीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात येत 1 ऑक्टोबर निवडणूक प्रक्रिया राबवण्यास सांगण्यात आले. मात्र, पुढील आठ ते दहा दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सहकार निवडणूकांना ब्रेक लागणार आहे. यामुळे नगरचा सहकार विभाग सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे.

नगर जिल्ह्यात 450 ते 500 सहकारी संस्थांच्या निवडणूक होणे बाकी आहेत. यातील ब वर्गातील मोजक्या सहकारी संस्था, बँकांचा समावेश आहे. जिल्ह्यात जादा तर क आणि ड वर्गातील संस्थांच्या निवडणूक रखडलेल्या आहेत. यात मजूर संस्था, छोट्या सहकारी सोसायट्या, हॉसिंग सोसायट्यासह अन्य संस्थांचा समावेश आहे. यातील बर्‍या संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर लोकसभा निवडणुकीमुळे आहे त्यास्थितीत थांबवण्यात आल्या होत्या. तर राज्यात अ वर्गाच्या 42, ब वर्गाच्या 1 हजार 716, क वर्गाच्या 12 हजार 250 आणि ड वर्गाच्या 15 हजार 435 संस्थांच्या निवडणुका होणे बाकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या