Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संलग्न जिल्ह्यांशी समन्वय आवश्यक - विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संलग्न जिल्ह्यांशी समन्वय आवश्यक – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. 8 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा): Nashik

- Advertisement -

नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन यांच्या नियोजनासाठी नाशिकसह संलग्न जिल्ह्यांचाही सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे कुंभमेळा कालावधीत तयार केलेल्या नियोजन आराखड्यात या जिल्हा प्रशासन आणि तेथील यंत्रणांचीही तितकीच महत्वपूर्ण भूमिका आहे, असे प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने नाशिक विभाग आणि संलग्न पुणे, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमधील डांग आणि वलसाड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखऱ सिंह, डांगचे जिल्हाधिकारी एन.डी. परमार, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी डॉ. गेडाम म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीच्या काळात होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्याचे नियोजन होणे अत्यावश्यक आहे. नाशिककडे येणाऱ्या धुळे, पालघर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे आदी मार्गावरुन येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, तासन् तास त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी नाशिक संलग्न असलेल्या जिल्हा प्रशासनाची महत्वाची भूमिका आहे. नाशिक जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणासोबत समन्वय राखून नाशिक मध्ये येणारी भाविकांची गर्दी त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी रोखणे, त्यांना आवश्यक सुविधा त्यासाठी उपलब्ध असतील याची व्यवस्था करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी भाविकांना थांबविले जाईल त्याठिकाणी खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्था तसेच आरोग्य विषयक काही सुविधा असणे अपेक्षित आहे. नाशिक शहरातील भाविकांची गर्दी कमी झाली की तसे हे भाविक नाशिकच्या दिशेने सोडण्याचे नियोजन तेथील स्थानिक प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषता: महामार्गावरून येणारी वाहतूक सुरळीत करणे, अति गर्दी आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेणे, भाविकांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना पर्याया मार्ग उपलब्ध करुन देणे आणि त्यासंदर्भातील नियोजन इतर जिल्ह्यातील यंत्रणांना माहित असणे आवश्यक आहे. याशिवाय, संबंधित जिल्ह्यात महामार्गालगत जेथे जेथे जागा उपलब्ध आहेत, तेथे ही व्यवस्था असणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय अतिशय महत्वाचा असल्याचेही डॉ. गेडाम यांनी नमूद केले.

यावेळी कुंभमेळा आयुक्त सिंह यांनी सादरीकरणाद्वारे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच, संबंधित संलग्न जिल्ह्यांकडून काय अपेक्षा आणि पूर्वतयारी अपेक्षित आहे, याची माहिती दिली.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखऱ सिंह, म्हणाले की, मागील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा आणि नुकताच प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता यावर्षी नाशिक येथे सिंहस्थ कालावधीत 8 ते 10 कोटी भाविक येतील असा अंदाज आहे तर त्र्यंबकेश्वर येथे हीच संख्या 4 कोटी पर्यत जाण्याचा अंदाज आहे. अमृतस्नान पर्वणीच्या दिवशी नाशिक येथे एकाच दिवशी दीड कोटी तर त्र्यंबकेश्वर येथे 75 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाविकांच्या या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्राधिकरणाने नियोजन तयार केले आहे. खासगी बसेस तसेच इतर राज्यातील बसेस, खासगी वाहने यांना प्रवेश मर्यादीत असणार असून नियंत्रित क्षेत्रात महाराष्ट्र परिवहन सेवेच्या बसेसची शटल सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

नाशिकला संलग्न असणाऱ्या जिल्हा प्रशासनांनी त्यांच्या क्षेत्रातील वाहतूक सुरळीत राहील, घाट रस्ते व्यवस्थित असतील, आपत्ती व्यवस्थापन नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही होईल, याची दक्षता घेणे, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यासह महत्वाच्या बाबींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमणे याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या वेळी धुळे, जळगाव, नंदुरबार सह वलसाड येथील जिल्हाधिकारी तसेच पुणे आणि भुसावळ येथील रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हे दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीस महामार्ग पोलीस, प्रादेशिक परिवहन, महाराष्ट्र परिवहन महामंडळ, नगरपालिका प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...