संगमनेर |वार्ताहर| Sangamner
राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्या इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्याचे निर्देश परीक्षा मंडळाच्यावतीने देण्यात आले आहे. या दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. सदर परीक्षेत विविध मार्गांनी निष्पन्न होणार्या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपापल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवत असतात, त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी फेब्रुवारी-मार्च परीक्षेवेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 20 जानेवारी ते 26 जानेवारी, 2025 या कालावधीत कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहे त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जनजागृती करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करणेबाबत प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी माहिती द्यावी. तसेच कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाच्या वेळी घ्यावी.
शाळा स्तरावर मंडळ शिक्षा सूचीचे वाचन करावे. मंडळाच्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचना व प्रवेश पत्रावरील सूचनांचे वाचन करणे, गैरमार्ग केल्यास होणार्या परिणामांची जाणीव करून देणे, परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ज्ञांमार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्बोधन करावे, परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करावे. तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवावी, कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढावी. ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक/शिक्षक यांनी अभियानासंदर्भात वरील विषयांबाबत माहिती द्यावी, अशा सूचना केलेल्या आहे.